शेतकऱ्याच्या कष्टाची राखरांगोळी
। नेरळ । प्रतिनिधी ।
पाषाणे येथील खरवंडी वाडी मधील शेतकऱ्याने साठा करून ठेवलेल्या भाताच्या मोळ्यांना अज्ञात व्यक्तीने आग लावली. त्या आगीच्या घटनेने शेतकरी बाळू दरोडा यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, भाड्याने शेती करण्यासाठी घेतलेल्या शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट आले आहे.
कर्जत तालुक्यातील पाषाणे ग्रामपंचायत हद्दीतील खरवंडे (आदिवासी वाडी) येथील शेतकरी बाळू गोमा दरोडा यांनी खाड्याचापाडा येथील एका शेतकऱ्याकडून शेत जमीन भातपीक लागवडीसाठी घेतली होती. यावर्षी अवकाळी पावसाने भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले असताना शेतकऱ्याने मेहनत करून 150 मोळ्या भाताचे भारे बांधले होते. त्या मोळ्यांना उडवी बनवून त्यांची साठवणूक दरोडा यांनी केली होती. मात्र, त्याच उडवी करून ठेवलेल्या भाताच्या मोळ्यांना अज्ञात व्यक्तीने आग लावली. त्या आगीमध्ये शेतकरी दरोडा यांचे मोठे नुकसान झाले असून यावर्षी पावसाने झोडपून काढलेले, पीक कसेबसे वाचवले आणि कुटुंबाला हातभार लावणारे पीकही आगीत भस्म झाल्याने बाळू दरोडा अक्षरशः हवालदिल झाले आहेत. या आगीत शेतकऱ्याकडे ना खाण्यासाठी भात उरला ना गुरांसाठी पेंडा उरला. जे पीक त्याच्या संसाराला आधार देणार होते, तीच भाताची गंजी आता राख होऊन शेतात काळा ढीग बनून उरली आहे. वर्षभराची घाम गाळलेली मेहनत, कष्टाने उभा केलेला पिकाचा आधार आणि भविष्यातील एकमेव अशा क्षणात जळून खाक झाली असून त्या शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून पोलिसात त्या आगीबद्दल तक्रार देण्यात आली आहे.
