वणव्यामुळे कंपनी परिसरात आग

| खोपोली | वार्ताहर |

सावरोली येथ इंडिया बुल्स प्रकल्पाच्या व गेल कंपनीच्या सबस्टेशन जवळ मोकळ्या रानमाळावर शनिवारी दुपारी 12 च्या दरम्यान वणवा लागला. वणवा इतका भयानक होता की आगीचा भडका वाढताच उच्च दाबाच्या लाईन असल्याने अधूनमधून स्फोटही होत होते. गॅस वाहून नेणार्‍या गेल कंपनीच्या लाईन व मुख्य व सबस्टेशन असल्याने या ठिकाणी परिस्थिती चिंताजनक झाली होती. त्यामुळे ही आग अटोक्यात आणण्यासाठी परिसरातील कंपन्यांतील फायर ब्रिगेडच्या वाहनांना पाचारण करण्यात आले होते. ही आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले.

आग विजविण्यासाठी खोपोली फायर ब्रिगेड, देवदूत यंत्रणा खालापूर टीम, उत्तम स्टीलचे फायर ब्रिगेड, टाटा स्टीलची फायर ब्रिगेड च्या वाहनांतून पाण्याच्या फवार्‍या मुळे आगीची तीव्रता कमी करण्यात यश मिळाले. अपघातग्रास्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेची टीम जवळजवळ तीन तास प्रयत्न करत होते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तहसीलदार आयुब तांबोळी, खालापूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी सर्व यंत्रणांचे नियोजन करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. खालापूर तालुका पोलीस स्टेशनची सर्व टीम आणि खालापूर तहसील कार्यालयाचे सर्व कर्मचारी, नायब तहसीलदार सुधाकर राठोड याने प्रत्यक्ष घटनास्थळी मदत कार्यात सहभाग घेतला. त्यामुळे तीन तासांनंतर ही आग आटोक्यात यश मिळविले.

Exit mobile version