पनवेल अग्निशमन दलाचा फोन बंद; आपत्कालीन सेवेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल शहरात रात्रीच्या वेळी वीज खांबावरील तारांना अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती देण्यासाठी नागरिकांनी पनवेल अग्निशमन दलाच्या 27461500 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा क्रमांक बंद असल्याचे आढळल्याने आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळवण्यासाठी नागरिकांची धावपळ उडाली. या घटनेमुळे अग्निशमन विभागाच्या संपर्क यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वीज खांबावरील तारांना आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र, वारंवार संपर्क साधूनही दूरध्वनी क्रमांक लागत नसल्याने नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. आपत्कालीन परिस्थितीत थेट अग्निशमन दलाशी संपर्क होत नसल्याने नागरिकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला.
अखेर नागरिकांनी पोलिसांच्या 100 क्रमांकावर संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी नवीन पनवेल अग्निशमन केंद्राला कळविले. दरम्यान, अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच विद्युत कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. त्यामुळे संभाव्य धोका टळला. मात्र, आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाशी संपर्क साधण्यात आलेल्या अडचणींमुळे आपत्कालीन यंत्रणेच्या तत्परतेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने आपत्कालीन दूरध्वनी क्रमांकाची तातडीने तपासणी करून तो चोवीस तास कार्यरत राहील, याची खात्री करणे आवश्यक आहे. तसेच, मुख्य क्रमांक बंद पडल्यास नागरिकांना त्वरित मदत मिळावी यासाठी पर्यायी संपर्क क्रमांक प्रसिद्ध करणेही गरजेचे आहे. आपत्कालीन सेवांमधील अशा त्रुटींकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. अग्निशमन दलाचा संपर्क क्रमांक बंद का होता, त्याची दुरुस्ती कधी केली जाणार आणि भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी कोणती उपाययोजना केली जाणार, याबाबत महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
मदत कशी मिळणार?
आगीसारखी दुर्घटना घडल्यास प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. अशा वेळी अग्निशमन दलाचा दूरध्वनी क्रमांकच बंद असेल, तर नागरिकांनी मदतीसाठी कुणाकडे धाव घ्यायची, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. सुदैवाने या घटनेत विद्युत कर्मचाऱ्यांनी वेळेत आग नियंत्रणात आणली; मात्र दुसऱ्या एखाद्या गंभीर दुर्घटनेच्या वेळी संपर्क यंत्रणा बंद असल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.







