फटाक्यांमुळे डोंगरमाथ्यावर आग

। पनवेल । वार्ताहर ।
तळोजा कारागृह शेजारी असलेल्या डोंगरावर लागलेली आग विझविण्यात पर्यावरण प्रेमींना यश आले आहे. काही तरुणांनी संध्याकाळी डोंगरालगत फटाके फोडल्यामुळे डोंगरावर आग लागली होती.
खारघर सेक्टर-35 मधील तळोजा कारागृह लगत असलेल्या डोंगरावर वणवा पेटला. यावेळी डोंगरावर गेलेल्या चार ते पाच तरुणांनी आग विझविण्यास सुरुवात केली. दरम्यान, एका नागरिकाने सदर आगीबाबत खारघर आग्नशमन केंद्राला माहिती दिली. त्यानंतर काही वेळाने आग्नशमन दल जवानांनी घटनास्थळी येवून डोंगराच्या पायथ्याशी लागलेली आग आटोक्यात आली.
डोंगर माथ्यावर वणवा लागल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. मात्र, डोंगरावर अग्निशमन दलाचा बंब पोहचू शकत नसल्यामुळे आग्नशमन दल जवान माघारी फिरले. यावेळी पर्यावरण आणि पक्षी प्रेमी ज्योती नाडकर्णी तसेच त्यांचे दोन सहकारी डोंगरावर लावलेल्या रोपट्यांलगतची गवत काढत होते. त्या तिघांनी डोंगर माथ्यावर लागलेली आग रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास आटोक्यात आणली. तळोजा कारागृह लगत असलेल्या डोंगरावर पर्यावरण प्रेमींनी लावलेली रोपटी आगी पासून सुरक्षित आहेत. मात्र, पावसाळ्यात डोंगरावर उगवलेली नैसर्गिक रोपटी जळून खाक झाली.
दरम्यान, तरुणांनी वन संपदा नष्ट करण्याऐवजी वाचविण्यासाठी सहकार्य करावे तसेच डोंगरावर फटाके फोडू नयेत, असे आवाहन पर्यावरण प्रेमींनी केले आहे.

Exit mobile version