सचिन घाडी मित्रमंडळ व वनविभागाला विझविण्यात यश
| सोगाव | वार्ताहर |
मागील काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यातील डोंगरावर वणवे लागायचे सत्र काही थांबता थांबेना. रोज कुठे ना कुठे अज्ञाताकडून वणवा लावला जात आहे. यावर वनविभागाने जनजागृती करूनदेखील समाजकंटकांकडून वणवे लावले जात आहेत. जंगलातील बिबट्या, माकडे, सरपटणारे प्राणी आदी वन्यप्राणी वणवे लागल्यामुळे मानव वस्तीत येण्याचे प्रमाण वाढले आहे.
बुधवार, दि.21 रोजी सोगाव व कनकेश्वर डोंगरावर अज्ञात समाजकंटकाने आग लावली होती. सोगाव डोंगरावर लागलेली आग सचिन घाडी मित्रमंडळाच्या आदित्य गायकवाड, साकीब कुर, अनमोल कांबळे, अजिंक्य, अमन काझी, हुझेफा मुल्ला, हाशीम मुल्ला, आशितोष कांबळे, निमेश कांबळे, अनिकेत चव्हाण, डॉ. अनिल जाधव, सचिन घाडी यांनी मोठ्या कष्टाने आग आटोक्यात आणली. तसेच कनकेश्वर डोंगरावर लागलेली आग वनविभागाचे भाऊसाहेब शिवाजी जाधव,वनरक्षक पंकज घाडी,स्नेहा म्हात्रे,वनमजूर जितेंद्र पाटील ग्रामस्थ निशांत घरत, संकेत कवळे-बहिरोळे यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.आग लावणार्या समाजकंटकाचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी मापगांव येथील पर्यावरण प्रेमी मंगेश चिंतामण राऊत यांनी वनविभागाला केली आहे.