जेएसडब्ल्यूतर्फे 1350 पुस्तके, फार्मिवर साहित्याची भेट
| खारेपाट | वार्ताहर |
कोएसो माध्यमिक विद्यामंदिर माणकुले वार्षिक पारितोषिक वितरण सन 2022-23 चे वितरण समारंभ नुकताच पार पडला. यावेळी जेएसडब्ल्यू फाऊंडेशन सी. एस-आर प्रॉडक्ट लिडर संतोष पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यविजय पाटील होते. यावेळी चेरमन खरेदी-विकी संघ अलिबाग, प्रभारी सरपंच योजना ठाकूर, मुख्याध्यापक जी.सी. पाटील, शाळा समिती सदस्य डॉ. मनोज पाटील, शुभांगी पाटील, कार्याध्यक्ष टी.व्ही. पाटील व पंचक्रोशीतील ग्रामस्थ हजर होते. मान्यवरांच्या हस्ते रांगोळी प्रदर्शन, हस्तकला, चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. माणकुले विद्यालयातील शैक्षणिक, कला, क्रीडा, विज्ञान, विविध क्षेत्रात उल्लेखनिय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना संतोष पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. विशेष म्हणजे, माणकुले हायस्कुल येथे नव्याने शाळेचे रूम बांधून देण्यास जेएसडब्ल्यू कंपनीचे मोठे योगदान आहे. त्याचप्रमाणे या वर्षात जेएसडब्ल्यू फाऊंडेशन सीएसआरकडून शाळेसाठी 1370 पुस्तके, 5 कपाटे, 2 टेबल, 10 खुर्ची व इतर साहित्य वाचनालयाकरिता देण्यात आले. तसेच विद्यालयाकरिता व सदर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीकरिता सर्वोत्तोपरी सहकार्य केले जाईल, असे संतोष पाटील यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्यविजय पाटील यांनी माणकुले विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना दोन वह्या व पेन अशा शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. या कार्यक्रमाला प्रभारी सरपंच योजना ठाकूर, माजी उपसरपंच सुभाष पाटील, प्रदीप पाटील, शुभांगी पाटील, जगन्नाथ म्हात्रे, तसेच बहिरीचा पाडा, माणकुळे, नारंगीचा टेप व येथील ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील मंडळी, महिला मोठ्या संख्येने हजर होत्या. सर्व उपस्थित मंडळीचे स्वागत शाळेच्या वतीने करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना व मान्यवरांना अल्पोपहार देण्यात आले. शाळा समिती सभापती अॅड. आस्वाद पाटील यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.