| भाईंदर | प्रतिनिधी |
मिरा-भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन दलात वाहनचालक व फायरमन पदावर कंत्राटी पद्धतीवर काम करणारे सुमारे 225 कर्मचारी मे ते जून या दोन महिन्यांच्या वेतानापासून वंचित राहिल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच ठेकेदाराकडून या कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सुरक्षा साहित्य अद्यापही न दिल्याने ते कर्मचारी त्या साहित्यविनाच आपत्कालीन सेवा बजाविताना दिसून येत आहेत.
पालिकेने हे मनुष्यबळ पुरविण्याचा ठेका बोरिवलीची सेक्युरिटी वन या कंपनीला एक वर्षांपूर्वी दिला आहे. सुमारे 125 कर्मचारी वाहनचालक तर उर्वरीत कर्मचारी फायरमन पदावर कार्यरत आहेत. ठेकेदारामार्फत वाहनचालकांना महिन्याचे वेतन सुमारे 18 हजार रुपये तर फायरमन्सना 22 हजार रुपये वेतन दरमहा दिले जात आहे. या कर्मचाऱ्यांना ठेकेदाराकडून गमबूटखेरीज अद्याप कोणतेही सुरक्षिततेचे साहित्य देण्यात आलेले नाही. त्यांना अग्निशमन दलाचे टि-शर्ट साठी ठेकेदाराला सुमारे 250 रुपये मोजावे लागतात. तर पॅन्टचे कापडदेखील ठेकेदाराकडून खरेदी करून ती स्वखर्चाने शिवून घ्यावी लागते.
याखेरीज या कंत्राटी कर्मचाऱ्यांना ठेकेदाराकडून गेल्या वर्षभरापासून अग्निशमन दलात काम करण्यासाठी अत्यावश्यक ठरणारे सुरक्षा साहित्य देण्यात आलेले नाही. मात्र या साहित्यांचा कर्मचाऱ्यांना मोफत पुरवठा करण्याची अट पालिकेने ठेकेदारासोबत केलेल्या करारात नमूद केलेली असतानाही ठेकेदार त्याचा भंग करीत असल्याचे समोर आले आहे. मात्र, त्यावर पालिका अधिकाऱ्यांचा कोणताही अंकुश नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे ते कर्मचारी आपत्कालीन सेवा टि-शर्ट, पॅन्ट व गमबुटवरच देत असून अग्निशमन दलातील फायरमनसाठी अत्यावश्यक असलेला पोशाख त्यांना देण्यात न आल्याने आगीसारखी आपत्कालीन सेवेत कर्तव्य बजाविताना त्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. केवळ कर्मचाऱ्यांच्या वेतनावर ताव मारून आपली झोळी भरण्याकडे लक्ष देणाऱ्या अधिकाऱ्यांनी कमी वेतनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबतही संवेदनशील राहावे, अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे. अशातच या कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या लेबर युनियनकडून त्यासाठी प्रयत्न केले जात नसल्याने हे कर्मचारी मागण्यांपासून दूर आहे. याबाबत वाहनचालकांनी मनसेचे कामगार नेते संदीप राणे यांच्या माध्यमातून उपायुक्त डॉ. सचिन बांगर यांची शुक्रवारी भेट घेतली असता त्यांनी ठेकेदाराला संपर्क साधून दोन दिवसांत वेतन त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात आले.