| रोहा / धाटाव | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील कोलाडनजिक तिसे रेल्वे फाटकावर सोमवारी (दि.21) दुपारी गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली. रेल्वे फाटकावर सुरक्षा रक्षक म्हणून कामावर असलेले स्थानिक चंद्रकांत कांबळे यांच्यावर अज्ञात इसमाने गोळीबार केला. कपाळाला गोळी लागल्याने चंद्रकांत कांबळे अक्षरशः रक्ताच्या थारोळ्यात पडले अन् त्यांचा मृत्यू झाला.
चंद्रकांत कांबळे यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार करून पोबारा केला. या अनपेक्षित घटनेने संबंध जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. दरम्यान, रेल्वे सुरक्षा रक्षक चंद्रकांत कांबळे यांची गोळीबार करून हत्या का करण्यात आली, याचा अंदाज अजून बांधता आलेला नाही. त्याबाबत तपास सुरू असल्याचे कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे यांनी सांगितले. चंद्रकांत कांबळे हे आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते होते. कोकण रेल्वे संघटनेवर पदाधिकारी होते. रेल्वे संघटनेच्या अंतर्गत वादातून गोळीबार झाला असावा, त्याबाबत सखोल चौकशी करावी, आमच्या भावना तीव्र आहेत, अशी संतप्त प्रतिक्रीया तिसे ग्रामपंचायतीचे सरपंच राकेश कांबळे यांनी दिली.
कोलाड रेल्वे फाटकावर सोमवारी दुपारी गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. रेल्वे फाटकावर गेटमन म्हणून कामावर असलेले पाले बुद्रुक येथील चंद्रकांत कांबळे हे दुपारी जेवण करत होते. त्याचवेळी अज्ञात इसमाने समोरून चंद्रकांत कांबळे यांच्यावर गोळी झाडली. कपाळावर गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. गोळीबार करणारा अज्ञात इसम फरार झाल्याचे समोर आले. गोळीबाराचे वृत्त कळताच कोलाड पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक अजित साबळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, कांबळे कुटुंब, ग्रामस्थांना मोठा धक्का बसला. गोळीबाराच्या प्रकाराने रोहा, कोलाड यांसह सबंध जिल्हा चांगलाच हादरला.
चंद्रकांत कांबळे यांच्यावर गोळीबार करून हत्या का करण्यात आली, कशासाठी हत्या झाली, कोणी केली? असे अनेक सवाल उपस्थित झाले. चंद्रकांत कांबळे यांच्यावर गोळीबार करताना फाटकावर कोणी कसे नव्हते, याबाबतही काही समोर आले नाही. सद्यस्थितीत घटनास्थळी वातावरण चांगलेच तंग आहे. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते चंद्रकांत कांबळे यांची अशी हत्या व्हावी, हे सर्व धक्कादायक, तेवढेच निषेधार्थ आहे. आम्हाला मोठा धक्का बसला आहे. चंद्रकांत कांबळे यांच्यावर जवळून गोळीबार कोणी केला, याचा तातडीने छडा लागावा, अशी मागणी सरपंच राकेश कांबळे व समाजाने केली आहे.
अंतर्गत वादातून हत्या?
रेल्वे संघटनेत चंद्रकांत कांबळे यांचे मोठे काम आहे. ते रेल्वे संघटनेचे मोठे पदाधिकारी आहेत, त्याच अंतर्गत वादातून हत्या झाली असावी, असा अंदाज काहींनी व्यक्त केला. चंद्रकांत कांबळे यांच्यावर गोळीबार का करण्यात आला, याचा तपास आम्ही जलदगतीने करणार आहोत. सर्व घटनेची नोंद घेणे सुरू आहे, अशी प्रतिक्रिया सहा पोलीस निरीक्षक अजित साबळे यांनी दिली. दरम्यान, कोलाड येथील रेल्वे फाटकावरील गोळीबार प्रकरणाने सबंध जिल्ह्यात एकच हाहाकार उडाला. चंद्रकांत कांबळे यांची गोळीबार करून हत्या का करण्यात आली, तपासातून नेमके काय समोर येते ? याकडे कोलाड यांसह सबंध जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.