| मुंबई। वृत्तसंस्था।
मुंबईलगतच्या पालघर जिल्ह्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस या लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये रेल्वे सुरक्षा बळ अर्थात आरपीएफच्या हवालदाराने गोळीबार केला. यामध्ये आरपीएफचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, आज (दि.31) पहाटे पाच ते सहाच्या सुमारास जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेसच्या एकूण तीन डब्यांमध्ये गोळीबार झाला. B5, S6 आणि पँट्री कारमध्ये आरपीएफचा हवालदार चेतन सिंहने हा गोळीबार केला आहे. जयपूर सुपरफास्ट वापी स्थानकाजवळ असताना हवालदार चेतन सिंह आणि काही प्रवाशांमध्ये वाद झाला. यामध्ये चेतनला इतरा राग आला की त्याने प्रवाशांवर बंदूक उगारली. हे पाहून आरपीएफचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टीकाराम मीणा यांनी चेतनला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र चेतन काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता आणि त्याने त्याच्या वरिष्ठांसह प्रवाशांवरही गोळीबार केला, ज्यामध्ये चारही जणांचा जागीच मृत्यू झाला.
आरोपीने फायरिंग केल्यानंतर चैन खेचून रेल्वे थांबवली आणि पळ काढण्याचा प्रयत्न केला असता शेजारीच कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांनी त्याला पकडले. आरोपी चेतन सिंह सध्या जीआरपीच्या ताब्यात आहे. बोरीवली स्थानकातील आरपीएफ पोलीस स्टेशनमध्ये त्याची चौकशी सुरु आहे. तर चारही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले आहेत. टिकाराम मीणा (एएसआय, आरपीएफ), अब्दुल कादर, मोहम्मदहुसेन भानपुरावाला रा. नालासोपारा, अख्तर अब्बास अली, रा. शिवडी अशी मृतांची नावे असून टिकाराम मीणा या सहाय्यक पोलीस निरिक्षकाच्या कुटुंबांना २५ लाख रुपयांची नुकसान तर इतर तीन जणांच्या कुटुंबियांशी संपर्क केला असून त्यांना नुकसानभरपाई दिली जाईल, अशी घोषणा रेल्वेनं केली आहे.