मतदान केंद्रांवर होणार प्रथमोपचार

कर्मचारी, मतदारांच्या सेवेसाठी आरोग्य कर्मचारी तैनात

| अलिबाग | प्रमोद जाधव |

रायगड जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका निर्माण होण्याची भीती आहे. कामात व्यस्त राहल्याने कर्मचाऱ्यांचे आरोग्य बिघडण्याची भीती अधिक आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांसह मतदारांच्या सेवेसाठी आरोग्य कर्मचारी तैनात केले जाणार असून, त्यांच्याकडून प्राथमिक उपचार केले जाणार आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थितीत शहरी भागात 108 व ग्रामीण भागात 102 क्रमांकाची रुग्णवाहिका सज्ज राहणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी 13 उमेदवार रिंगणात असणार आहेत. पाच मे रोजी सायंकाळी साडेपाचनंतर प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यानंतर सात मे रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात सुमारे दोन हजारांहून अधिक मतदान केंद्रे आहेत. या मतदान केंद्रांवर सुमारे 12 हजार 500हून अधिक कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.

जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. सकाळी दहा वाजल्यापासून उन्हाचे चटके प्रचंड जाणवत आहेत. घरातून बाहेर पडणे नकोसे होत आहे. त्यात लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची कामे जोरात सुरु झाली आहेत. प्रशासकीय कामकाजासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे.

मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांसह मतदारांच्या आरोग्याची काळजीदेखील आरोग्य विभागामार्फत घेतली जाणार आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनानुसार शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे यांच्या नेतृत्वाखाली शहरी व ग्रामीण भागात आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यात दोन हजारांहून अधिक मतदान केंद्रांमध्ये प्रत्येकी आरोग्य कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. त्यांच्यासोबत औषधांचा साठा उपलब्ध असणार आहे. मतदानासाठी रांगेत उभे राहणाऱ्या मतदारांसह मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवा दिली जाणार आहे. तसेच आपत्कालीन परिस्थिती रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी जिल्ह्यातील 54 प्राथमिक आरोग्य केंद्रात 102 क्रमांकाची व शहरी भागात जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालयात 108 क्रमांकाची रुग्णवाहिका ठेवली जाणार आहे. जेणेकरून रुग्णांना तातडीने उपचार मिळावा यासाठी हा एक वेगळा उपक्रम जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार राबविण्यात आला आहे.

मतदान केंद्रामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांसह 102 व 108 क्रमांकाची रुग्णवाहिका उपलब्ध असणार आहे. वेगवेगळ्या प्रकारची औषधे या ठिकाणी ठेवली जाणार आहेत. प्राथमिक उपचार आरोग्य कर्मचाऱ्यांद्वारे केले जाणार आहे. ग्रामीण व शहरी भागात ही व्यवस्था केली जाणार आहे.

अंबादास देवमाने, जिल्हा शल्यचिकित्सक
अशी दिली जाणार सेवा
जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत मतदान केंद्रात आरोग्य कर्मचारी ठेवले जाणार आहेत. प्राथमिक उपचारासाठी औषधांचा बॉक्स असणार आहे. त्यामध्ये इलेक्ट्रोलाईट पावडर, ओआरएस पावडर, दुखापत झाली असल्यास मलमपट्टी लावली जाणार आहे. तसेच ज्या रुग्णांना रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांचा रक्तदाब तपासून आरोग्यविषयक मार्गदर्शनदेखील यावेळी केले जाणार आहे.
Exit mobile version