ओम् पिंपळेश्वर, विजय बजरंग , शिवशक्ती, पिंपळेश्वर यांची विजयी सलामी
| मुंबई | प्रतिनिधी |
ओम् पिंपळेश्वर, विजय बजरंग व्यायाम शाळा, शिवशक्ती, पिंपळेश्वर यांनी श्री साई क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या प्रथम श्रेणी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. मफतलाल कंपाऊंड, लोअर परेल येथील स्व. दत्ता गोताड क्रीडांगणावर झालेल्या पहिल्या सामन्यात ओम् पिंपळेश्वर मंडळाने वीर संताजी मंडळाला 37-24 असे पराभूत केलेले. ओमकार जाधव, शुभम साटम, चेतन गावकर यांच्या आक्रमक सुरुवातीने ओम् पिंपळेश्वरने पहिल्या सत्रात 20-09 अशी आघाडी घेतली होती.
दुसऱ्या सत्रात सुर सापडलेल्या वीर संताजी संघाच्या ओमकार शिर्के, निशांत डांगे यांनी बऱ्या पैकी प्रतिकार केला.विजय बजरंग व्यायाम शाळेने अतिशय चुरशीच्या लढतीत अशोक मंडळाला 34-31 असे चकवित आगेकूच केली. आकाश निकम, अक्षय उगाडे, गणेश तुपे यांच्या चढाई पकडीच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर विजय बजरंगने पूर्वार्धात 18-12 अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धात मात्र अशोक मंडळाच्या सूरज सुतार, विघ्नेश पाटील यांनी जोरदार प्रतिहल्ला करीत संघाला विजया समीप नेले होते. पण वेळेचे गणित चुकल्याने अशोक मंडळाला पराभव पत्करावा लागला. शिवशक्तीने हिंद केसरीचा दुबळा प्रतिकार 49- 23 असा सहज मोडून काढत दुसरी फेरी गाठली.
साई चौगुले, दीपक शिंदे शिवशक्ती कडून, तर प्रणव वाडकर हिंद केसरी कडून उत्तम खेळले.शेवटच्या सामन्यात पिंपळेश्वर मंडळाने विकास मंडळाला 31-21 असे पराभूत केले. सोहम बेलोसे, राज कुऱ्हाडे, अनिल केसरवानी यांच्या चढाई आणि पकडीच्या चतुरस्त्र खेळाने पिंपळेश्वरने विश्रांतीला 17-09 अशी मोठी आघाडी घेत विजयाचा पाया रचला. विश्रांती नंतर सावध खेळ करीत आपला विजय साकारला. विकासच्या अवधूत शिंदे, विराज सिंग यांनी बऱ्या पैकी लढत दिली. या स्पर्धेचे उद्घाटन सिद्धेश सुनील शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तदप्रसंगी दीपक बागवे, मंडळाचे स्वंस्थापक किसन पवार आदी मान्यवर उपस्थित होते.