प्रथम श्रेणी कबड्डी स्पर्धा

सुनील स्पोर्टस, गोलफादेवी सेवा, शिवशक्ती क्रीडा, विजय क्लब उपांत्यपूर्व फेरीत

| मुंबई | वृत्तसंस्था |

सुनील स्पोर्टस, शिवसक्ती क्रीडा, विजय क्लब यांनी विजय नवनाथ मंडळाने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या पुरुष प्रथम श्रेणी कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. गोलफादेवीला मात्र याकरिता 5-5 चढायांच्या डावापर्यंत संघर्ष करावा लागला. सेनापती बापट मार्ग, लोअर परेल येथील फिनिक्स टॉवर शेजारील मैदानात सुरू असलेल्या पाचव्या दिवशी वरळी कोळीवाडा येथील गोलफादेवीने प्रभादेवीच्या यंग प्रभादेवीचा कडवा संघर्ष 5-5 चढायांच्या डावात 37-33(7-3) असा मोडून काढला. पूर्वार्धात 12-09 अशी आघाडी घेणाऱ्या गोलफादेवीला यंग प्रभादेवीने पूर्ण डावात 30-30 असे बरोबरीत रोखले. 5-5 चढायांत गोलफादेवीने बाजी मारली. धनंजय सरोज, सनी कोळी यांच्या चढाई पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. रुपेश किर, स्मित साळवी यांचा खेळ यंग प्रभादेवी संघाच्या विजयाकरीता थोडा कमी पडला.

ना. म. जोशी मार्गच्या सुनील स्पोर्टस्‌‍‍ ने शेजारच्या बंड्या मारुतीला 35-23 असे नमविले. रोहन जाधव, शोहेब मुल्ला, जय बागल सुनील कडून, तर प्रणित देसाई, ऋषिकेश गोपाळे बंड्या मारुती कडून उत्कृष्ट खेळले. शिवशक्तीने विजय बजरंगचा कडवा प्रतिकार 25-22 असा संपुष्टात आणला. मध्यांतराला 1गुणाने पिछाडीवर पडलेल्या शिवशक्तीने मध्यांतरानंतर आपला खेळ उंचावत ही किमया साधली. अभिषेक कोरे, साई चौघुले यांच्या उत्कृष्ट चढाया त्यांना संतोष वारकरीची मिळालेली पकडीची साथ त्यामुळेच शिवशक्तीला हा विजय साकारता आला. आकाश निकम, सिद्धेश खांडेकर यांचा खेळ विजय बजरंगला विजयी करण्यास कमी पडला. शेवटच्या सामन्यात दादरच्या विजय क्लबने साऊथ कॅनराला 38-28 असे पराभूत केले. पहिल्या डावात चुरशीने खेळला गेलेल्या या सामन्यात 18-16अशी विजयकडे आघाडी होती. राज नाटेकर, रोहन तिवारी, विजय दिवेकर यांच्या चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते. साऊथ कॅनराचे अमन शेख, किरण गर्जे चमकले.

Exit mobile version