। सिडनी । वृत्तसंस्था ।
पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया दौर्यावर आहे. पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून दोन गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. हा सामना खूपच रोमांचक झाला होता. मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा हा एकदिवसीय सामन्यातील पहिलाच पराभव आहे.
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तान संघाला तिसर्याच षटकात सॅम अयुबच्या (1) रूपाने पहिला धक्का बसला. दुसरा सलामीचा फलंदाज शफीक (26) देखील जास्त वेळ टिकू शकला नाही. तिसर्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या बाबर आझमने कर्णधार मोहम्मद रिझवानसोबत मोठी भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला, मात्र तोही अपयशी ठरला. बाबर 37 धावा करून बाद झाला. रिझवानने कर्णधारपदाची खेळी खेळताना 71 चेंडूत 44 धावा केल्या. यानंतर नसीम शाहने 40 धावांची खेळी केली. शाहीन आफ्रिदीनेही 22 धावा केल्या. यामुळे पाकिस्तानचा संघ 46.3 षटकात 203 धावांपर्यंत मजल मारू शकला. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज स्टार्कने सर्वाधिक 3 बळी, कमिन्स आणि अॅडम झाम्पाने प्रत्येकी 2 बळी तर लॅबुशेन आणि अॅबॉट यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
प्रत्युत्तरात 204 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणार्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर मॅथ्यू शॉर्ट आणि जेक फ्रेझर मॅकगर्क यांनी 28 धावसंख्येवर आपल्या विकेट गमावल्या. यानंतर, स्टीव्ह स्मिथ आणि जोश इंग्लिश यांच्या 85 धावांच्या भागीदारीमुळे सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने गेला. मात्र, 185 धावांवर ऑस्ट्रेलियाने 8 गडी गमावले असताना कमिन्सने 32 धावांची नाबाद कर्णधार खेळी खेळून संघाचा 2 गडी राखून विजय निश्चित केला. त्याच्याशिवाय जोश इंग्लिशने 49 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. पाकिस्तानकडून हॅरिस रौफने सर्वाधिक 3 फलंदाज बाद केले. शाहीन आफ्रिदीला 2 तर नसीम शाह आणि मोहम्मद हसनने 1 बळी घेतला आहे.