सरपटणारे प्राणी व उभयचरांचे सर्वेक्षण
। मुरुड जंजिरा । सुधीर नाझरे |
जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात सरपटणार्या प्राण्यांची गणना महाराष्ट्रात प्रथमच पार पडली. उपवनसंरक्षक अक्षय गजभिये , सहाय्यक वनसंरक्षक मनोहर दिवेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी नारायण राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली फणसाड अभयारण्य व ग्रीन वर्क्स ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने फणसाड अभयारण्यात भुपृष्टावरील सरपटणारे प्राणी व पक्ष्यांची गणना नुकतीच पूर्ण झाली आहे. या सर्वेक्षणासाठी 11 राज्यातील एकूण 143 जणांची नोंदणी केली असली तरी केवळ 3 राज्यातील 40 जणांची निवड करण्यात आल्याची माहिती फणसाड अभयारण्य विभागाने दिली.
उल्लेखनीय बाब म्हणजे हा जैवविविधता गणनेचा उपक्रम स्टेट बँक ऑफ इंडिया व ग्रीन वर्क्स ट्रस्ट यांच्या संयुक्त पुढाराकाने हाती घेतल्यामुळे फणसाड अभयारण्यातील दुर्मिळ जैव विविधतेचा सूक्ष्म आणि स्थुल अभ्यास करून निश्चितपणे काही निरीक्षण नोंदविणे शक्य होणार असल्याचा विश्वास ग्रीन वर्क्स ट्रस्ट च्या पदाधिकार्यांनी व्यक्त केला.
फणसाड अभयारण्य समुद्र खाडीलगत मुरुडसह रोहा व अलिबाग या तीन तालुक्यात सुमारे 52 चौ.कि.मी.मध्ये विस्तारले असुन सांबर, भेकर, रानडुक्कर, सायाळ, पिसोरी, शेकरु, बिबटे आदी वन्यजीव येथे आढळतात. हे अभयारण्य जणू वनसंपदेचे आगारच म्हणता येईल. या सर्वेक्षणात ग्रीन वर्कचे संस्थापक अध्यक्ष निखिल भोपाळे त्यांची संपूर्ण टीम तसेच नांदगाव वनपाल आदेश पोकळ, वनरक्षक अरुण पाटील, संतोष पिंगळा, वनमजुर प्रदीप बगाडे, सदानंद नाईक आदींनी तिसर्या निरीक्षणात 4 किमी जंगलाची पायवाट तुडवित प्राणी व पक्ष्यांच्या नोंदी घेतल्या. संपूर्ण कार्यक्रम पूर्णपणे पेपरलेस झाला. सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्रजातींचे रेकॉर्ड लॅपटॉपमध्ये दाखल झाले आणि शेवटच्या दिवशी सहभागींना ई-प्रमाणपत्रे देण्यात आली. सर्वेक्षणादरम्यान, भारतीय फ्लॅपशेल कासव आणि कॉमन सँड बोआ प्रथमच अभयारण्यात आले असल्याची माहितीही प्राप्त झाली.
तीन दिवसीय सर्वेक्षण कार्यक्रमात भुपृष्ठावर सरपटणार्या प्रजातींमध्ये मुख्यतः साप 16, बेडूक 20, सस्तन प्राणी 10, 7 गेको, 3 मॉनिटर सरडे, 1 स्किंक आणि 1 गिरगिटासह 45 नागीण, पाली 4, घोरपड 3, फुलपाखरु 50 व 104 प्रकारचे पक्षी नोंदविण्यात आले. प्रजातींची नोंद करण्यात आली. हा एक अनोखा अनुभव सहभागींनी बोलून दाखवला. ग्रीन वर्क्स ट्रस्टचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. निखिल भोपळे यांनी बेडकांच्या प्रजाती ओळखण्यावर एक सत्र आयोजित केले. ज्यामुळे सहभागींना सर्वेक्षणादरम्यान बेडूक ओळखण्यास मदत झाली.
ग्रीन वर्क ट्रस्टचे विश्वस्त यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, भुपृष्ठावरील प्राण्यांची मोजदाद करण्यासाठी तज्ज्ञ अभ्यासकांना खुप वाव आहे. स्टेट बँकेने अर्थसहाय्य दिल्याने खर्या अर्थाने ही गणना शास्त्रोक्त पद्धतीने होऊ शकेल. ही हर्प काऊटिंग सलग 5 वर्षे करायला हवी. यापूर्वी फणसाड अभयारण्यातील गणना नियोजनबध्द रित्या झाली नसल्याची माहिती त्यांनी दिली.