पहिले मराठी भाषा विद्यापीठ महाराष्ट्रात

। रत्नागिरी । वृत्तसंस्था।
मराठी भाषा जगाच्या पाठीवर पोहोचविण्यासाठी देशातील पहिले मराठी भाषा विद्यापीठ महाराष्ट्रात करण्यात येईल, असे आश्‍वासन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले. कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे शिक्षण विभाग पंचायत समिती रत्नागिरी, कोकण मराठी साहित्य परिषद, कवी केशवसुत स्मारक मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
‘मराठी भाषा अधिक सुदृढ करण्यासाठी मराठी भाषा दिन साजरा करण्यात येतो. मराठी भाषा जगाच्या पाठीवर पोचविण्यासाठी देशातील पहिले मराठी भाषा विद्यापीठ महाराष्ट्रात करण्यात येईल. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली असून ते त्याबाबत सकारात्मक आहेत. त्यामुळे मराठी भाषेला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळेल. सातशे वर्षांपूर्वीच्या भाषांना अभिजात भाषांचा दर्जा देण्यात आला आहे; मात्र बाराशे वर्षांपूर्वीच्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळू शकत नाही. यासाठी आपण सर्वांनी देखील पुढाकार घेणे गरजेचे आहे.’’खासदार विनायक राऊत म्हणाले, “शासनस्तरावर मराठी भाषा समृद्ध, सुदृढ होण्यासाठी जे जे करणे आवश्यक आहे ते करण्यात येत आहे.’’ कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष नमिता कीर म्हणाल्या, “मराठी भाषा अधिक समृद्ध करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. वाचन, लेखन संस्कृती वाढविणे आवश्यक आहे. या वेळी खा. विनायक राऊत, रमेश कीर, अरुण नेरुरकर, नमिता कीर, गजानन पाटील उपस्थित होते.

Exit mobile version