आधी रेल्वेचा फार्स आता मेट्रोसाठी अभ्यास

नायगाव-अलिबाग मार्गावर धावणार मेट्रो

| रायगड | प्रतिनिधी |

मध्य रेल्वेच्या लोकलची अलिबागकरांना प्रतीक्षा कायम असताना दुसरीकडे मुंबई मेट्रोची धाव थेट अलिबागपर्यंत येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने विरार-अलिबाग बहुद्देशीय मार्गिकेवरील नायगाव रेल्वे स्थानक ते अलिबाग अशा 136 किमीच्या मेट्रो मार्गिकेसाठीच्या व्यवहार्यता अभ्यास सुरू केला आहे. येत्या सहा महिन्यांत मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यात येणार आहे. एकीकडे दिल्लीच्या तख्तापर्यंतआजी- माजी खासदारांनी मजल मारूनही रेल्वेची पर्यायी मार्गिका उपलब्ध असताना देखील रेल्वे अलिबागपर्यंत रेल्वे पोहचू शकली नाही. तर दुसरीकडे अलिबाग विरार कॉरिडॉर प्रकल्पाला अद्याप सुरुवात झाली नसतानाही मेट्रो आणण्याचा अभ्यास करण्यासाठी एमएसआरडीसीने पथक नेमले आहे. या पथकाच्या सर्वेक्षणानंतरच मेट्रोचा प्रकल्प आराखडा तयार केला जाणार आहे.

विरार ते अलिबाग ही 128 किमीची बहुउद्देशीय मार्गिका एमएसआरडीसीकडून बांधण्यात येणार आहे. या मार्गिकेसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरु असून बांधकामासाठीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही महिन्यांत नवघर ते बळवली या पहिल्या टप्प्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. या मार्गिकेत मेट्रो प्रस्तावित करण्यात आली असून 26.60 मीटर रुंदीची जागा मेट्रोसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. ही मार्गिका पूर्ण झाल्यानंतर मेट्रो बांधण्यात येईल असे सांगितले जात असतानाच आता येत्या काही काळातच मेट्रोही मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नायगाव ते अलिबाग मेट्रो मार्गिकेच्या व्यवहार्यता तपासणीला मे. मोनार्च सर्व्हेअर अँड इंजिनीयरिंग कन्सल्टंट या सल्लागार कंपनीच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे. हा अभ्यास येत्या सहा महिन्यात पूर्ण होईल. मार्गिका व्यवहार्य ठरल्यास प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे मुख्य अभियंता एस.के. सुरवसे यांनी दिली.

बहुउद्देशीय मार्गिकेवरील प्रस्तावानुसार भिवंडीतील खारगाव येथून मेट्रो सुरु होऊन पेण येथील बळवली येथे संपणार होती. मात्र आता राज्य सरकारच्या निर्देशानुसार वसई तालुक्यातील नायगाव पश्चिम रेल्वे स्थानकापासून मेट्रो सुरू होऊन अलिबाग येथपर्यंत जाईल. ही 136 किमी लांबीची मार्गिका सेवेत  दाखल झाल्यानंतर सर्वाधिक लांबीची मेट्रो ठरेल. या मार्गिकेवर 40 मेट्रो स्थानके प्रस्तावित असून त्यात वाढ होण्यात्ही शक्यता आहे. या मार्गिकेच्या कारशेडसाठी जागा शोधावी, असे निर्देशही राज्य सरकारने एमएसआरडीसीला दिले आहेत. या मार्गिकेमुळे अलिबागच्या पर्यटनाला यामुळे चालना मिळणार असून वसई, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, पनवेल, उरण, पेण आणि अलिबाग तालुक्यांचा सर्वांगीण विकास साधला जाण्याची अपेक्षा आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जेएनपीएदेखील या मेट्रोमुळे जोडले जाणार आहेत.
मुंबईचे उपनगर बनण्यासाठी अलिबाग तालुका सज्ज होत आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या अलिबाग तालुक्यालारेल्वे प्रवासी वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणे गरजेचे होते. त्यानुसार मागणी होऊन अलिबागला रेल्वे आणण्यासाठीच प्रयत्न राजकीय मातब्बरांनी केला. दिल्लीमध्ये रेल्वे मंत्र्यांना साकडेदेखीलघालण्यात आले होते. अलिबागलारेल्वे आणण्यासाठी आरसीएफच्यामालगाडीचारूळ पर्याय म्हणून सुचविण्यात आला होता. लोकसभेच्या निवडणुकीचा अलिबागची रेल्वे हा मुद्दा कायम प्रकाशझोतात राहिला आहे. तत्कालीन माजी खासदार अनंत गीते आणि विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनी अलिबागला रेल्वे आणण्याचे आश्वासन अनेकदा अलिबागकारांना दिले आहे. परंतु आजतागायत अलिबागला रेल्वे येण्याचामुहूर्त सापडलेला नाही. परंतु अलिबागलामेट्रो येण्याचा मुहूर्त लवकरच सापडण्याची चिन्हे आहेत.

बहुउद्देशीय मार्गिकेवरील प्रस्तावित मेट्रो मार्गिकेच्या व्यवहार्यता अभ्यासाला सुरुवात झाली आहे. हा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर चित्र स्पष्ट होईल. या मेट्रो मार्गिकेचे काम नेमके कोण करणार, हेदेखील अद्याप निश्चित झालेले नसून त्याचा निर्णय राज्य सरकार घेईल.

अनिलकुमार गायकवाड,
व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी
Exit mobile version