आधी रेल्वेसेवा नियमित करा, मग हॉटेल उभारा

स्थानिकांसह पर्यटकांची मध्य रेल्वेकडे मागणी


| माथेरान | वार्ताहर |


दिवसेंदिवस माथेरानला पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेली आहे. ऐन सुट्ट्यांच्या हंगामात साधे लॉज मिळणेसुद्धा कठीण बनते. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या माध्यमातून वापरा व हस्तांतरण करा या धर्तीवर माथेरान रेल्वे स्टेशन परिसरातील जागेत पॉड हॉटेल उभारण्यात येणार आहे. भविष्यात या पॉड हॉटेलमुळे पर्यटकांना स्वस्तात राहण्याची व्यवस्था निर्माण होणार आहे. यातूनच इथल्या पर्यटनाला चालनादेखील मिळणार आहे यात वाद नाही; परंतु येणाऱ्या पर्यटकांना प्रवासाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी उन्हाळ्यात नेरळ ते माथेरानदरम्यान मिनिट्रेन सेवा नियमित सुरू ठेवा, अशी मागणी स्थानिकांसह पर्यटकांकडून करण्यात येत आहे.

माथेरानला येणारे पर्यटक हे केवळ ह्या मिनिट्रेनची सफर घडावी यासाठी येत असतात, परंतु नेरळ ते माथेरानदरम्यान ट्रेन नसल्याने त्याचप्रमाणे माथेरान ते अमन लॉज अशा शटल सेवेच्या फेऱ्यात केवळ दोन बोग्या द्वितीय श्रेणीच्या असून, एक बोगी प्रथम श्रेणीकरिता ठेवण्यात आली आहे आणि दोन मालवाहू बोग्या असतात, त्यामुळे एका वेळेस जेमतेम शंभर प्रवासी कसेतरी प्रवास करताना दिसतात. हजारो पर्यटक सुट्ट्यांच्या हंगामात येत असतात; परंतु तिकीट उपलब्ध होत नसल्याने त्यांचा पुरता हिरमोड होताना दिसून येत आहे. नाईलाजाने त्यांना अवाजवी रक्कम मोजून घोडा आणि हातरिक्षा त्याचप्रमाणे हमाल करून आपले सामान दस्तुरी नाक्यापर्यंत न्यावे लागत आहे. मध्य रेल्वेने पॉड हॉटेल जरूर उभारावे; परंतु येणाऱ्या पर्यटकांनादेखील सुविधा निर्माण करण्यासाठी ट्रेन वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे स्थानिक नागरिक तसेच पर्यटक बोलत आहेत.

माथेरान मध्ये पॉड हॉटेल्स उभारण्यात येणार आहे हे ऐकून समाधान वाटले पण नेरळ येथून यायला रेल्वेच्या सुविधा नाहीत त्यामुळे खासगी वाहनाने आम्हाला दस्तुरी नाक्यावर यावे लागते आणि तेथून पुढे माथेरान स्टेशनपर्यंत पायपीट करावी लागते. सर्वाना घोडा किंवा हातरिक्षाचे दर परवडणारे नाहीत त्यामुळे खूपच दमछाक होते त्यासाठी रेल्वे प्रशासनाने नेरळ ते माथेरान तसेच अमन लॉज ते माथेरान ह्या शटल सेवेमधील द्वितीय श्रेणीच्या बोग्यात वाढ करावी

आशुतोष पांडे, पर्यटक, मुंबई
Exit mobile version