आधी लोकसभा निवडणुकीचे पडघम

| रायगड | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा परिषद निवडणूक लढवून नगरसेवक होण्याचे स्वप्न अनेकांनी उराशी बाळगले आहे. यात काही नवखे असून, काहींची पुन्हा नगरसेवक होण्याची महत्त्वाकांक्षा आहे. मात्र, विविध कारणांमुळे ही निवडणूक वर्षभरापासून लांबणीवर पडली असून ती नजीकच्या काळात होण्याची कोणतीच चिन्हे नाहीत. त्यात आता लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यासाठी राजकीय पक्षांचे सर्व कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. त्यात रायगड जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांचाही समावेश आहे. परिणामी, ”आधी लगीन लोकसभेचे मग जिल्हा परिषदेचे ” या मानसिकतेत राजकीय पुढारी आणि कार्यकर्ते आहेत.

रायगड जिल्हा परिषदेची पंचवार्षिक मुदत संपली आहे. त्यापूर्वी निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र, कोविड प्रतिबंधक नियम, इतर मागासवर्गीयांचे ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षणाची न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राज्यातील सत्तांतर, त्यानंतर प्रभाग रचनेबाबत राज्य सरकारने बदललेले निर्णय आदी कारणांमुळे रायगड जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर पडली. त्यात जवळपास दोन वर्षांचा कालावधी उलटला आहे. वर्षभरापासून परिषदेवर प्रशासकपदी विराजमान असलेले मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड धुरा सांभाळत आहेत. आता मे महिन्यात लोकसभेची मुदत संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. राजकीय पक्षांच्या राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांकडूनही उमेदवार जागा वाटप व निवडणूक लढवण्याची तयारी सुरू आहे. नेत्यांचे दौरे सुरू आहेत. त्यामुळे रायगड जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुकांच्या अपेक्षांवर तूर्त तरी पाणी फेरले आहे.

लोकसभेनंतर विधानसभा निवडणूक

लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर विधानसभा निवडणुका लागतील. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीची पाच वर्षांची मुदतही संपणार आहे. त्यासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची लगबग संपत नाही, तोच विधानसभेची तयारी राजकीय पक्षांना करावी लागणार आहे. परिणामी, रायगड जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असणाऱ्यांच्या आशेवर पाणी फिरु शकते, अशी सध्याची राजकीय स्थिती आहे.

मेहनत पाण्यात..!

रायगड जिल्हा परिषदेची मुदत संपण्यापूर्वी एक वर्ष अगोदरपासूनच इच्छुकांनी तयारी सुरू केली होती. त्यात माजी जिल्हा परिषद सदस्यांबरोबरच नवइच्छुकांचाही समावेश होता. त्यामुळे आपापल्या भागात त्यांनी मोठ्या थाटात जनसंपर्क कार्यालयेही सुरू केली होती. शुभेच्छा फलक असो व श्रद्धांजली फलक, सार्वजनिक कार्यक्रम असो वा डिजिटल मीडियावर भावी नगरसेवक म्हणूनच त्यांची ”दादा”, ”नाना”, ”भाऊ”, ”अण्णा, बापू, ”युवा”, ”नेते” अशा टोपण नावांनी छबी झळकली होती. सण, उत्सव, समारंभांसाठी त्यांनी मोठा खर्च केला; पण वेगवेगळ्या कारणांनी निवडणूक लांबत गेली आणि इच्छुकांनी हात आखडता घेतला.

Exit mobile version