शेतकऱ्यांची संतप्त प्रतिक्रीया
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील नेरळ-कळंब या राज्यमार्ग रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरू झाले आहे. या रस्त्यावर साडेपाच मीटर रुंदीचा काँक्रीटचा रस्ता बनणार आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे तोडली जाणार आहेत. तसेच, रस्त्याचे रुंदीकरण केले जात असताना रस्त्यासाठी कोणत्याही प्रकारे जमीन अधिग्रहीत करण्यात आलेली नसताना शेतकऱ्यांची पूर्व संमती न घेता रस्त्यावरील कामे सुरू असल्याने शेतकरी संतप्त झाला आहे आहेत.
नेरळ-कळंब रस्त्यावरील नेरळ रेल्वे फाटक ते पोही फाटा या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण केले जात आहे. नव्याने या रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार असल्याने शेतकऱ्यांची जमीन देखील वापरली जाणार आहे. त्या जमिनीचे कोणतेही अधिग्रहण शासनाने केलेले नाही आणि त्यामुळे हे सर्व शेतकरी आपली जमीन देण्यास तयार नाहीत. तसेच, शेतकऱ्यांची कोणतीही परवानगी न घेता रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. पूर्वी शेतकऱ्यांना शासनाने कोणत्याही प्रकारचा मोबदला दिलेला नव्हता. आता सरकार पुन्हा या रस्त्याचे रुंदीकरण करत असून त्यासाठी देखील येथील शेतकऱ्यांची जमीन वापरली जाणार आहे आणि त्या जमिनीचा मोबदला देण्याची मागणी शेतकऱ्यांनी करीत दहिवलीपासून बिरदोलेपर्यंत अनेक ठिकाणी रस्त्याची कामे अडवली आहेत. तसेच, हा रस्ता तयार केला जात असताना रस्त्याच्या आजुबाजूला असलेली झाडे तोडली जाणार आहेत आणि त्यामुळे शेतकरी आणखी संतापलेला आहे. आधी रस्त्यासाठी घेतलेल्या जमिनीचा मोबदला द्या आणि नंतर रस्त्याचे काम करा, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. तसेच, शेतकऱ्यांची कोणतीही झाडे तोडली जाऊ नये, अशी देखील शेतकऱ्यांची मागणी आहे.
आगरी समाज संघटना शेतकऱ्यांच्या पाठीशी
शेतकऱ्यांचा जमीन रस्त्यासाठी देण्यास विरोध असून रस्ता रुंदीकरण करू नये आणि झाडे तोडली जाऊ नये, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र, तरी देखील शेतकऱ्यांवर अन्याय केल्यास शेतकऱ्यांची जी भूमिका असेल त्या भूमिके सोबत जात आमची कर्जत तालुका आगरी समाज संघटना शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. समाज संघटनेचेवतीने रस्त्याच्या दुतर्फा जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या सोबत या रस्त्याचे काम पाहणाऱ्या ठेकेदाराच्या कार्यालयात जाऊन आपल्या मागण्यांचे निवेदन बांधकाम खात्याचे उप अभियंता यांना दिले आहे.
