अवैध सावकारीचा पेणमध्ये पहिला बळी;आरोपींमध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारी

आत्महत्तेस प्रवृत्त करणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते
। पेण । प्रतिनिधी ।
गेली वर्षभर दैनिक कृषीवल अवैध सावकारी विरोधात वेळोवेळी सर्वसामान्यांवर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मेहनत घेत आहे. परंतु, याकडे खादी आणि खाकीवाल्यांनी अक्षम्य दुर्लक्ष केले. कृषीवल वृत्तपत्र वेळोवेळी पेण तालुक्यात चाललेल्या अवैध सावकारीला आळा बसण्यासाठी पुढाकार घेत होता. जेणेकरुन एखादया निष्पाप व्यक्तींचा बळी जाऊ नये. परंतु, आज अखेर अवैध्य सावकारीच्या जाचाला कंटाळून दिव गावच्या एका तरुणाने आपली जीवनयात्रा संपविली.

अवैध सावकारीचा धंदा करणार्‍यामध्ये राष्ट्रवादी तालुका महिला अध्यक्षांचा सुपुत्र तथा पेण तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष साजन चंद्रहास पाटील व अन्य दोन जण आहेत. महत्वाची बाब म्हणजे एका राजकीय पक्षाच्या आडून व मोठ-मोठया नेत्यांच्या बरोबर फोटो टाकून सर्वसामान्यांना धमकावणे, अवैध सावकारी करणे व या सावकारीतून माया जमा करणे.

बड्या नेत्यांसोबतचे फोटो सोशल मिडियावर शेअर करुन साजन पाटील यांच्याकडून फसवणूक

दिव येथील युवक विजय म्हात्रे यांनी साजन पाटील, मयुर धांडे व भुषण म्हात्रे यांच्याकडून सहा महिन्यापूर्वी महिन्याला दहा टक्के व्याजाने पैसे घेतले होते. तीन महिने व्यवस्थित व्याज दिले. परंतू, काही कारणास्तव विजय याला व्याज देता आला नाही. म्हणून साजन पाटील, मयुर धांडे व भुषण म्हात्रे यांनी 12 नोव्हेंबर, 14 नोव्हेंबर आणि 15 नोव्हेंबर रोजी विजयला हाताबुक्कयाने मारहाण, शिवीगाळ तसेच रस्त्यावरुन उचलून साजन याच्या घरी नेणे, बळजबरीने स्टॅम्प पेपरवर लिहून घेणे. या प्रकाराला कंटाळून विजय याने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

21 नोव्हेंबर 2022 रोजी व्याजासह 67 हजार रुपये विजय याने या तीन सावकारांना देण्याचे कबूल केले होते. असे असताना देखील विजय याला मारहाण करुन त्याला अपमानित केले व आत्माहत्येला प्रवृत्त केले असल्याचा आरोप मृत तरुण विजय याची बहीण विजया रमेश म्हात्रे हिने वडखळ पोलीस ठाण्यात दिली आहे. वडखळ पोलीस ठाण्यात साजन पाटील, मयुर धांडे, भुषण म्हात्रे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्हाचा तपास पोलीस निरीक्षक नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली वडखळ पोलीस करीत आहेत.

आरोपींना राजकीय अभय असल्याची चर्चा
या गुन्हयातील आरोपी साजन चंद्रहास पाटील हा पेण तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी शाखेचा अध्यक्ष असून त्याची आई चैत्राली पाटील ही पेण तालुका महिला अध्यक्ष आहे. यांचे राष्ट्रवादीच्या बडया नेत्यांबरोबर बसणे-उठणे असल्याचे बोलले जात असून साजन पाटील यांच्या फेसबुक अकाउंटवर टाकलेल्या फोटोंमध्ये मा.उप. मुख्यमंत्री, मा.पालकमंत्री, मा.मंत्री तथा खासदार यांच्या सोबत फोटो असल्याने व याच फोटोंचा अधार घेउन साजन पाटील दमदाटी, अवैध सावकारी करीत असल्याची चर्चा संपूर्ण वाशी विभागात सुरु आहे.

आरोपींना तातडीने अटक न केल्यास रस्त्यावर उतरु.या गुन्हयातील आरोपींना राजकीय वरदहस्त असल्याने आमचे कुणीही वाकडे करणार नाही. या थाटात वावरत आहेत. त्यांना गुन्हा करुनही पश्‍चाताप होत नाही. पोलीस यंत्रणेने तातडीने यातील आरोपींना अटक न केल्यास रस्त्यावर उतरुन न्याय मागू.

-विवेक म्हात्रे, सरपंच दिव

या गुन्हयातील तीनही आरोपींवरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 नुसार गुन्हा दाखल करुन अवैध सावकारीसारख्या धंदयाला आळा घालणे गरजेचे आहे . भा.द.वी. कलम 306 व्यतिरिक्त सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल व्हावा. या आरोपींना राजकीय अभय असल्याने सावकारी गुन्हा दाखल होत नसेल तर आम्हाला वेगळा मार्ग निवडावा लागेल.

स्वप्नील म्हात्रे, लालब्रिगेट अध्यक्ष

पेण तालुक्यातील राष्ट्रवादीच्या वरीष्ठ पदाधिकार्‍यांना संपर्क करुन या प्रकरणाची विचारणा केली असता सर्वांनीच चुपकी साधली. त्यामुळे अखेर जिल्हा अध्यक्ष मधुकर पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, माहिती घेतो, चौकशी करतो. दोषी अढळल्यास साजन पाटील याला पदावरुन काढून टाकू. पक्षाचे पद जनसामान्यांच्या हितासाठी असते. त्रास देण्यासाठी नसते.

– मधुकर पाटील, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

Exit mobile version