दूषित पाण्यामुळे मासे मृत्युमुखी

| अलिबाग | प्रतिनिधी |

थळमधील खाडीतील मासे सोमवारी अचानक मृत्युमुखी पडलेले आढळून आले. या घटनेने मच्छिमारांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. अलिबाग तालुक्यातील थळ येथील आरसीएफ कंपनीच्या दूषित पाण्यामुळे हे मासे मृत्युमुखी पडल्याचा आरोप मच्छिमारांनी केला आहे. थळ येथे गेल्या अनेक वर्षांपासून खतनिर्मित आरसीएफ कंपनी आहे. या कंपनीचे दूषित पाणी खाडीत सोडले जात आहे. त्यामुळे अनेक वेळा मासे मृत पावल्याची घटना घडली असल्याचे मच्छिमारांनी सांगितले. येथील कोळी समाजाचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय असून, यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. परंतु, सोमवारी सकाळी अचानक मच्छिमारांना खाडीलगत खेकडा व अन्य मासळी मृत अवस्थेत आढळून आली.

कंपनीने दूषित पाणी सोडल्याने मासे मृत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत कंपनी प्रशासनाशी संपर्क साधला असता, खाडीतील मासे मृत्युमुखी झाल्याची माहिती मिळाल्यावर संबंधित विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मासे कशामुळे मृत झाले याचे कारण स्पष्ट झाले नाही. परंतु, पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. त्यानंतर मासे कशामुळे मृत झाले हे स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.

Exit mobile version