पाण्याच्या अभावामुळे मासे मृत्युमुखी

। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील कुडकी धरणातून पाण्याचा विसर्ग मर्यादित किंवा थांबवल्याने याचा फटका नदीतील हजारो माशांना बसला आहे. पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे धरणातून पाणी सोडण्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. परिणामी, नदीचे पात्र कोरडे पडल्याने अनेक मासे मृत्युमुखी पडले आहेत. याशिवाय, नदीवर कपडे धुण्यासाठी येणार्‍या महिलांना अपुरे पाणी आणि मृत माशांच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. काही मासे हे पात्रातील छोट्याशा डबक्यांमध्ये अखेरच्या घटका मोजत आहेत.

श्रीवर्धन तालुक्यातील कुडकी पाटबंधारे योजनेवर वडवली, कुडकी, शिस्ते व गोंडघर ग्रामस्थांना पिण्याचे पाणी व शेतीसाठी मुबलक पाणी मिळत आहे. मात्र, पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे धरणातून पाणी सोडण्याकडे कुणीही लक्ष दिले नाही असे बोलले जाते. त्यामुळे उन्हाळ्याच्या तीव्रतेने नदीचे पात्र कोरडे ठाक झाले आहे. परिणामी, हजारो मासे तडफडून मृत्युमुखी पडत आहेत. तीव्र उन्हामुळे नदीपात्रातील पाणी आटले आहे. लाखो जलचर चिखलात मृतावस्थेत विखुरले गेले आहेत. अनेक चिखलात अखेरच्या घटका मोजत आहेत.

Exit mobile version