। उरण । वार्ताहर ।
होळी व धुळवडच्या निमित्ताने खवय्ये मासळीला पसंती देतात. मात्र या वर्षी मासळीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. आवक घटल्याने मासळी महाग झाली आहे. पापलेट, कोळंबी व सुरमई या मासळींचे दर किलोला एक हजार ते 1200 रुपयांवर पोहचले आहेत. मासळीचे घटते प्रमाण, सातत्याने वातावरणातील बदल, शासनाच्या जाचक अटी, मच्छिमारांचे रखडलेले अनुदान आदी कारणांमुळे मासळी आवक घटल्याचे मच्छिमारांच म्हणणे आहे. होळी आणि धुळवडीच्या दिवशी कुटुंबीय, नातेवाईक एकत्र येतात. या दिवशी मटण, मासे याला मागणी असते. समुद्रकिनार्यावर वास्तव्य करणार्या नागरिकांकडून आपल्या आवडत्या मासळीचा आस्वाद घेतला जातो. समुद्र किनार्यालगत तसेच शेजारील शहरात राहणार्या नागरिकांकडूनही मासळीचा आस्वाद घेतला जातो. मात्र यावर्षी त्यांना मासळीसाठी दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत. 400 ते 600 रूपये किलो असलेल्या कोळंबीचा दर एक हजार रुपये. सुरमई व पापलेट 600 ते 700 रुपयांवरून 1200 रुपयांवर पोहचला आहे. सध्या मासळीचा मोठा हंगाम नाही. त्यात होळीसाठी बोटी किनार्यावर आल्या आहेत. त्यामुळे मासळीच्या प्रमाणात घट झाल्याने दरात वाढ झाली आहे. साध्या मासळीवर समाधान मानावे लागत आहे.