| रत्नागिरी | प्रतिनिधी |
रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथे रविवारी (दि.30) सायंकाळी एक दुर्दैवी घटना घडली. येथील खाडीत मासेमारी करत असताना एका मच्छिमाराची छोटी होडी उलटल्याने ते पाण्यात बुडाले. अस्लम युनूस पेजे (वय 56, रा. गावखडी, रत्नागिरी) असे या मच्छिमाराचे नाव असून, त्यांचा शोध अद्याप सुरू आहे. या घटनेमुळे गावखडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अस्लम पेजे हे गावखडी येथील स्थानिक रहिवासी आहेत. रविवारी सायंकाळी ते नेहमीप्रमाणे आपली छोटी होडी घेऊन गावखडीच्या खाडीत मासेमारीसाठी गेले होते. मासेमारी करत असतानाच पाण्याचा अंदाज न आल्याने किंवा तोल गेल्याने त्यांची होडी अचानक पाण्यात उलटली. होडी उलटल्याचे लक्षात येताच आजूबाजूच्या काही लोकांनी आरडाओरडा केला, मात्र अस्लम पेजे हे पाण्यात दिसेनासे झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि मच्छिमारांनी घटनास्थळी धाव घेतली. रविवारी सायंकाळपासून त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.







