दर्याच्या राजाची बंदरांवर लगबग

बंदीनंतर मासेमारीसाठी 20 दिवस आधीच तयारी

| चिरनेर | प्रतिनिधी |

1 जूनपासून मासेमारी बंदीनंतर खोल समुद्रातील पावसाळी 1 ऑगस्टपासून मासेमारीला सुरुवात होणार आहे. मात्र, वीस दिवसांचा कालावधी उरला असतानाही मच्छिमारांची बोटी दुरुस्ती व तयारीसाठी लगबग सुरू झाली आहे. यामुळे करंजा, मोरा, कसारा, ससूनडॉक बंदरात हजारो मच्छिमारांची गर्दी झाली आहे.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाळ्याच्या प्रारंभापासून खवळलेला समुद्र शांत होतो. नीरव, शांत झालेल्या सागरात मासेमारीसाठी पोषक वातावरण असते. खोल समुद्रातील मासेमारीसाठी मच्छिमारांना 50 ते 70 वाव खोल समुद्रात जावे लागते. त्यासाठी एका खेपेसाठी 10 ते 12 दिवस खर्ची घालावे लागतात. खोल समुद्रातील मासेमारीच्या एक खेपेसाठी दीड ते दोन लाखांपर्यंत खर्च येतो. समुद्राच्या तळाशी असलेली सर्वच प्रकारची मासळी या पद्धतीत पकडली जाते. चांगल्या प्रतीची निर्यात करण्यायोगी असलेली मासळी खोल समुद्रातील मासेमारीत मिळत असल्याने या पद्धतीच्या मच्छिमारांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. त्यामुळे 50 ते 70 वाव खोल समुद्रातील मासेमारीसाठी 20 दिवसांआधीपासून तयारी सुरू झाली आहे. बोटींच्या डागडुजी, रंगरंगोटी, जाळींची दुरुस्ती, इंजिन आणि इतर तत्सम कामे करण्यासाठी मच्छिमारांची लगबग सुरू झाली आहे. यामुळे ससुनडॉक, करंजा, मोरा, कसारा आदी विविध बंदरात हजारो मच्छिमारांची गर्दी झाली आहे.

पावसाळी 61 दिवसांच्या बंदीनंतर एक ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या मासेमारीसाठी मच्छिमार आसुसलेले आहेत. यासाठी मच्छिमारांना शासनाकडून मिळणारा डिझेलचा कोटा वेळेतच उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी आतापासूनच बैठका घेऊन निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. मात्र, शासनाकडून वेळेत डिझेल कोटा मिळाला नाही तरी बाहेरून मिळणारे महागडे डिझेल खरेदी करून 1 ऑगस्टपासून मासेमारीसाठी निघण्याची तयारीही मच्छिमारांची असल्याची माहिती करंजा मच्छिमार संस्थेचे माजी उपाध्यक्ष तथा व्यावसायिक रमेश नाखवा यांनी दिली.

Exit mobile version