मच्छिमार आजही सोयीसुविधांपासून वंचित

केंद्रीय मंत्र्यांचे आ. रमेश पाटील यांनी वेधले लक्ष
। अलिबाग । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील थळ व नवगाव येथील राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. कंपनीच्या प्रकल्पामध्ये बाधित झालेल्या मच्छिमार बांधवांना मुलभूत सोयी सुविधा पुरविण्यात येतील, असे आश्‍वासन कंपनीने दिले होते. परंतु, आजतागायत त्यांना कोणत्याही सुविधा मिळालेल्या नाहीत, याकडे कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. रमेश पाटील यांनी केंद्रीय रसायन व खतमंत्री भगवंत खुबा यांची दिल्ली येथे भेट घेत त्यांचे लक्ष वेधले.
गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. कंपनीच्या मरिन आऊट फॉल पाईप लाईनमुळे रायगड जिल्ह्यातील थळ-नवगाव येथील स्थानिक मच्छिमार बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे तेथील स्थानिक प्रकल्पग्रस्त मच्छिमार बांधव मदत मिळण्यासाठी संघर्ष करीत आहेत. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. कंपनीकडून मच्छिमार बांधवांना जेटी, रस्ते, दिवाबत्ती व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्‍वासन दिले होते; परंतु आजपर्यंत त्यांनी या आश्‍वासनांची पूर्तता केलेली नसल्यामुळे मच्छिमार बांधव आजही या सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे या प्रकल्पग्रस्त बाधित मच्छिमार बांधवांना न्याय देण्याची व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी आ. रमेश पाटील यांनी केंद्रीय रसायन व खत मंत्री भगवंत खुबा यांच्याकडे केली.
यावर मंत्री महोदयांनी संबंधित अधिकार्‍यांना आरसीएफच्या दि. 22/01/2016 च्या पत्राचा खुलासा करण्यास सांगून पुढील महिन्यात महाराष्ट्रात आल्यानंतर यासंदर्भात बैठक आयोजित करून हा प्रश्‍न सोडवला जाईल, असे सांगितले असल्याची माहिती आ. रमेश पाटील यांनी दिली.

Exit mobile version