। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुडमधील शेकडो मच्छीमार बांधव समुद्राच्या भरतीवेळी आपल्या बोटी एकदरा खाडीत उभ्या करतात. परंतु, ओहोटी लागल्यावर खाडीतील गाळामुळे मच्छीमार बांधवांना आपल्या होड्या काढताना दमछाक होत आहे. त्यासाठी खाडीतील गाळ काढून ही खाडी रुंद व खोलगट करणे गरजेचे आहे. त्यामुळे आहोटीच्या वेळी देखील होड्या लावताना किंवा काढताना कोणताही त्रास होणार नाही, असे मत स्थानिक कोळी बांधवांकडून व्यक्त होत आहे.
याबाबत कृषीवलच्या प्रतिनिधींनी मुरुड सागर कन्या मच्छीमार सहकारी सोसायटीचे चेअरमन मनोहर बैले यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, 2017 साली एकदरा खाडीतला गाळ काढण्यात आला होता. परंतु, काही दिवसात गाळ पुन्हा भरु लागला. तरी सरकारने मंजूर केलेला तवसाळकर पासून ते दीपस्तभापर्यंत ग्रोयन्स बंधारा बांधवा, जेणेकरून ही खाडी आपोआप खोलगट होईल आणि कोळी बांधवांना यांचा फायदा होईल. तरी राज्य सरकाराने ग्रोयन्स बंधारा लवकरात लवकर बांधुन द्यावा, अशी मागणी मनोहर बैले यांनी केली आहे.