नाखवाच्या जाळ्यात ‘मासली गावना…जवला परवडना’

। अलिबाग । प्रमोद जाधव ।
गेल्या पंधरा दिवसापासून जवळ्याचा हंगाम सुरु झाला आहे. मच्छिमारांच्या जाळ्यात जवळा येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मच्छिमार मासेमारी करण्यामध्ये मग्न आहेत. या कालावधीत सुमारे 25 टन जवळा मिळाला असून, सुमारे 25 लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. मात्र, बदलते हवामान, समुद्रातील प्रदूषण, एलईडी, पर्सनेटद्वारे होणार्‍या मासेमारीचा फटका बसल्याने यंदा गतवर्षीच्या तुलनेने जवळ्याचे सुमारे 30 टक्के प्रमाण घटले असल्याची माहिती मच्छिमारांकडून देण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्याला 240 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. जिल्ह्यात पाच हजारपेक्षा अधिक बोटी आहेत. त्यात यांत्रिकी व बिगर यांत्रिकी बोटींचा समावेश आहे. या बोटींवर खलाशांसह तांडेल व मासेमारी करण्यापासून सुमारे 25 हजार कामगार काम करीत आहेत. जिल्ह्यातील अलिबाग, वरसोली, थळ, नवगाव, रेवस, मांडवा, रेवदंडा, थेरोंडा, आक्षी, श्रीवर्धन, म्हसळा या ठिकाणी लहान- मोठे मासेमारीचे बंदर आहे. या बंदरांतून मासळी उतरविण्याचे काम केले जाते.

जिल्ह्यात सध्या जवळ्याचा हंगाम सुरु झाला आहे. समुद्रात जवळा मोठ्या प्रमाणात सापडत आहे. एका बोटीमध्ये टनावर जवळा सापडत आहे. त्यामुळे जवळ्याची लॉटरीच लागत आहे. जवळा आणून तो निवडणे, सुकविणे त्यानंतर बाजारात नेणे, अशी अनेक प्रकारची कामे केली जात आहे. त्यासाठी आजूबाजूच्या गावांतील सुमारे सहा हजार कामगार काम करीत आहे. दिवसाला पाचशे ते एक हजार रुपये मजुरीवर ही मंडळी काम करीत आहेत. यातून त्यांना रोजगाराचे साधन मिळत आहे. समुद्रातील ओल्या जवळ्यातून सुमारे 25 लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. परंतु, गतवर्षीच्या तुलनेने यंदा जवळ्याचे प्रमाण कमी असल्याचे मच्छिमारांकडून सांगण्यात येत आहे.

जवळ्याला भाव कमी
समुद्रात जवळा चांगला मिळत आहे. परंतु, हा जवळा बारीक आहे. खाण्यायोग्य नाही. त्यामुळे पोल्ट्रीसाठी पाठवावा लागत आहे. ओला जवळा किलोमागे 30 ते 40 रुपये किलोने विकला जात आहे. जवळ्याला भाव नसल्याने मच्छिमारांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. मेहनत जास्त व पण पैसे कमी अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे मच्छिमारांकडून सांगण्यात येत आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून जवळ्याचा हंगाम सुरु झाला आहे. लाखो रुपयांची जवळ्यापासून उलाढाल झाली आहे. परंतु, हा जवळा फारच बारीक आहे. त्यात जवळा कमी मिळत आहे. गतवर्षीच्या तुलनेेने 25 ते 30 टक्के जवळ्याचे प्रमाण यंदा कमी आहे. जवळ्याला भावदेखील नाही.

विजय गिदी, चेअरमन, महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघ
Exit mobile version