| मुरुड जंजिरा | प्रतिनिधी |
मुरूडजवळील मोरा गावच्या समुद्रात बुधवारी (दि.20) सकाळी मासेमारी नौका अचानक उलटली. यामध्ये बोटीतून खाली पाण्यात पडलेल्या वसंत धर्मा कासारे (वय 37) यांचा मृत्यू झाला. वसंत यांचे भाऊ सुभाष कासारे आणि सुरेश कासारे यांनी पोहत किनारा गाठल्याने त्यांचा जीव वाचला.
मुरूड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी आठ वाजता वसंत कासारे, सुभाष कासारे, आणि सुरेश कासारे हे तिघे सख्ये भाऊ फायबरची नौका घेऊन मोरा या भागातील समुद्रात मासेमारीस गेले होते. सकाळी पावसाबरोबरच वारा जोरात वाहू लागला होता. वाऱ्यामुळे खोल पाण्यात गेल्यावर उसळत्या लाटांमुळे सदर नौका उलटून हे तिघे पाण्यात पडले.
सुरेश आणि सुभाष यांनी पोहुन किनारा गाठला. आपला छोटा भाऊ वसंत याला देखील वाचविण्याचा त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. परंतु अयशस्वी ठरले. वसंत यांच्या नाका तोंडात पाणी शिरल्याने ते गुदमरले आणि त्यांचा मृत्यू झाला. हे तिघेही मोरा गावचे रहिवासी आहेत. मृत वसंत यांच्या देहाचे मुरूड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.