नौकांची मासेमारी बंद

वादळी वातावरणाचा फटका

| मुरूड-जंजिरा | प्रतिनिधी |

महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार पावसाळ्यात 1 जून ते 31 जुलैपर्यंत समुद्रातील मासेमारी बंद राहणार आहे. मात्र, समुद्रात 24 मे पासूनच अकस्मातपणे वादळी वातावरण निर्माण झाल्याने मुरूड परिसरातील एकदरा, राजपुरी, दिघी येथील सुरू असलेली कोलंबी मासळीची मच्चीमारी काळा आधीच बंद करण्यात आली आहे. परिसरातील सुमारे 100 नौका किनाऱ्यावर नांगरण्यात आल्याची माहिती एकदरा गावचे नौका मालक रोहन निशानदार यांनी सांगीतले. तसेच, अचानक वादळी परिस्थिती आल्याने शेवटच्या सत्रात देखील धावपळ आणि नुकसान सहन करावे लागत असल्याची प्रतिक्रिया अनेक मच्चीमारांनी व्यक्त केल्या.

1 जून पूर्वी छोटी – मोठी मासेमारी करण्याचा आमचा प्रयत्न होता. शेवटच्या मासेमारी सत्रात पद्मजलदुर्ग समुद्र परिसरात कोलंबीची मासेमारी सुरू होती. परंतु, 24 मेपासून वादळी वातावरणामुळे ही मासेमारी देखील बंद करावी लागली आहे. बंगालमध्ये सुरू असलेल्या रेमल चक्रीवादळाचा देखील आधिक परिणाम अरबी समुद्रात होत असल्याचे येथील नाखवा मंडळींनी स्पष्ट केले. 12 वाव पेक्षा आधिक खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मोठ्या दालदी नौकांना देखील याचा फटका बसल्याचे सांगण्यात आले. यामुळे एकदरा, मुरूड खाडीत नौका नांगरण्यात आल्या असून दिघी, राजपुरी येथील मच्छीमारी देखील ठप्प असल्याचे सांगण्यात आले. यामुळे मुरूड मार्केटमध्ये मासळीचा ठणठणाट पाहायला मिळाला.

पावसाळ्यासाठी पर्यटक आणि मुरुड करांनी बोंबील, अंबाडी, वाकट्या, जवळा आदी सुकी मासळी, खरेदीसाठी मोर्चा वळविल्याचे दिसत होते. सोमवारी राजपुरी येथील सुकवलेला सफेद कोळीम(जवळा) मुरुडच्या मार्केटमध्ये विक्रीस आला होता. यावेळी जवळा खरेदीसाठी गर्दी होती. अखेरच्या मोसमात काहीशी कोलंबी मिळू लागली होती. वादळाचे संकट आल्याने मच्चीमारी साठीची उरली सुरली आशा आठ दिवस आधीच संपुष्टात आल्याची भावना रोहन स्थानीक मच्छीमारांनी व्यक्त केली.

Exit mobile version