मुरूडमधील मासेमारी पुर्णतः बंद

। मुरूड जंजिरा । वार्ताहर ।
शासनाच्या आदेशानुसार 1 जून पासून मुरूड, राजपुरी, एकदरा येथील मासेमारी पूर्णतः बंद करण्यात आली असून सर्व छोट्या- मोठ्या नौका किनार्‍यावर ओढण्यात आल्या आहेत.मार्केटमध्ये मासळीचा शुकशुकाट आहे. मासळी नसल्याने खवय्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. ताजी मासळी खाण्यासाठी येणार्‍या पर्यटकांना देखील याची झळ लागत असून या मंडळींनी आपला मोर्चा चिकन, मटणाकडे वळविल्याचे दिसून येत आहे.
दोन दिवसांपूर्वी राजपुरी येथे भरपूर प्रमाणात जवळा मासळी येत होती; परन्तु आता बंदरात शुकशुकाट आहे. एकदरा आणि मुरूड येथे कोलंबी येत होती, तेथे देखील हीच परिस्थिती असून खाडीपट्टी भागात करण्यात येणार्‍या बोक्षी मासेमारी हा एक छोटा आधार दिसत आहे. समुद्र किनारी भागातील खाजणात अशी मासेमारी केली जाते.सुकी मासळीला आता मागणी असून पर्यटक देखील आपापल्या घरी परतताना मुरूडची आठवण म्हणून किमान सुकी मासळी खरेदी करून समाधान मानत आहेत. पावसाळा सुरू झाला असला तरी शालेय सुट्टी असल्याने पर्यटकांचा ओघ कमी- जास्त राहील अशी माहिती काही व्यवसायिकांनी बोलताना दिली. यंदा पावसाळ्यात मासेमारी बंदी बाबत शासनाने निर्बंध आधिक कडक केल्याने कोणताही मच्चीमार मासेमारीस जाईल असे सध्य स्थितीवरून दिसत नाही.

Exit mobile version