राजपुरी बंदरात बंदी असताना सुद्धा मासेमारी सुरु

मुरुड जंजिरा । प्रतिनिधी ।
शासनाने 1 जून ते 31 जुलै यावेळेत मच्छिमारी बंदी असताना सुद्धा राजपुरी बंदरात राज रोस पणे मच्छिमारी सुरु आहे. माशांचा हा प्रजनन कालावधी असल्याने समुद्रातील मासे वृद्धिगत व्हावे यासाठी हा कालावधीत काटेकोर पणे मासेमारी बंद ठेवली जाते. परंतु शासनाचा हा नियम राजपुरी कोळीवाड्यातील मच्छिमार पाळत नाही.अनेक वेळा येथे कोणाचे हि भय न बाळगता मासेमारी सुरु आहे.तरी येथील मासेमारी मत्स्य विभागाने तातडीने बंद करण्यात यावी व दोषी व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे मुरुड तालुक्याचे मत्स्यविकास व परवाना अधिकारी यांच्याकडे हरिदास बाणकोटकर यांनी केली आहे.

याबाबत बाणकोटकर यांनी स्थानिक पत्रकारांची भेट घेऊन मत्स्यविकास अधिकारी याना दिलेले निवेदन तसेच राजपुरी बंदरात सुरु असलेल्या मासेमारीचे मोबाईल ने काढलेले फोटो तसेच व्हिडीओ चित्रण सुद्धा दाखवले आहे.

राजपुरी बंदरात गेल्या अनेक दिवसापासून मासेमारी सुरु असून सुद्धा मत्स्य विभागाचे अधिकारी मात्र येथे न फिरकल्याने राजरोसपणे मच्छिमारी सुरु असल्याचे दिसून येत आहे.राजपुरी बंदरातून मासळी आल्यावर इतर भागातील लोक ती खरेदी करण्यासाठी या ठिकाणी येतात त्यावेळी कोणताही मच्छिमार अथवा मासळी खरेदी करणारे लोक तोंडाला मास्क सुद्धा बांधत नाही.सामाजिक अंतर सुद्धा पाळत नाही.असे या तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे.गेल्या अनेक दिवसापासून हि मासेमारी सुरु असून ती तात्काळ बंद करण्यात यावी जर मत्स्य विभागाने तीन दिवसात हि मासेमारी बंद न केल्यास जिल्हाधिकारी रायगड यांच्या कार्यालयाजवळ उपोषण सुरु करणार असल्याचा इशारा निवेदनातून हरिदास बाणकोटकर यांनी मत्स्य विभागास दिला आहे.

याबाबत आमच्या प्रतिनिधीने मुरुड तालुक्याचे मत्स्यविकास व परवाना अधिकारी वाळुंज साहेब यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि.राजपुरी येथील मासेमारी बाबत निवेदन प्राप्त झाले आहे.आम्ही तात्काळ या भागाला भेट देऊन मच्छिमारांवर कायदेशीर कार्यवाही करणार आहोत.बोर्ली भागात सुद्धा मासेमारी बंदी काळात सुरु होती तिथे सुद्धा अनेक मच्छिमारांवर आमच्या विभागाने कार्यवाही केलेली आहे.लवकरच राजपुरी भागात आम्ही कार्यवाही करणार आहोत.

Exit mobile version