कोकणातील मच्छिमार आर्थिक संकटात
| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने दक्षिणेकडून हेटशी वारे कोकण समुद्रपट्टीत जोरदार वाहत आहेत. पुढील तीन दिवस अशीच परिस्थिती राहील, असे स्पष्ट आहे. हेटशी वादळी वारे असून, मासेमारीस मोठा व्यत्यय निर्माण करतात, अशी माहिती मुरूड येथे रायगड मच्छिमार संघाचे उपाध्यक्ष तथा राज्य मच्छिमार शिखर परिषदेचे संचालक मनोहर बैले यांनी सोमवारी दिली. गेल्या 3-4 दिवसांपासून हेटशी वार्यांनी कोकणचा संपूर्ण समुद्रकिनारा व्यापला असल्याने ऐन सीझनमध्ये मासेमारीवर मोठा परिणाम होणार आहे. बोटीचा रोजचा एकूण खर्च पाहता मच्छिमारांचे जबर आर्थिक नुकसान होईल, अशी भीती मच्छिमारांनी व्यक्त केली आहे.
मासेमारीच्या ऐन हंगामामध्ये कोकण भागातील समुद्रात वादळी पाऊस पडत असल्याने मासेमारी अर्धवट सोडून शेकडो नौकांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, रायगड जिल्ह्यातील आगरदांडा-दिघी बंदरात सुरक्षितता म्हणून शनिवारपासून आश्रय घेतला आहे. रविवारी रात्रीदेखील या नौका येथेच मुक्काम करून आहेत. गुजरात, कोकण, रत्नागिरी आदी भागातील या नौका आहेत, अशी माहिती आगरदांडा जेट्टीवर आलेल्या मच्छिमारांकडून मिळाली आहे. मोठी मासेमारी पूर्णपणे ठप्प आहे. शेकडो नौकांतील मच्छिमार गेल्या तीन दिवसांपासून जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी दिघी, आगरदांडा, मुरूड बाजारपेठेत येत असून, चिंताग्रस्त दिसून येत आहेत. वादळी वारे आणि पाऊस यामुळे खोल समुद्रात मोठ्या लाटा उसळत असून, मासेमारी करणे अत्यंत अवघड बनले आहे. जीवाचीदेखील भीती असून, अशा परिस्थितीत आम्ही सुरक्षितता म्हणून किनार्यावरील आगरदांडा बंदरात आलो आहोत, अशी प्रतिक्रिया मच्छिमारांनी दिली.
हेटशी वारे हे सोबत वादळ आणत असतात. त्यामुळे मासेमारीचे खूप नुकसान होत असते. यामुळे मोठी मासळीखोल समुद्रात जाऊन जवळजवळ तळाशी जाऊन भूमीगत होत असते. सहजासहजी जाळ्यात सापडत नाही. पुन्हा समुद्रात मासेमारीस जाण्यासाठी मोठा खर्च मच्छिमारांना करावा लागणार आहे.
– रोहिदास मकू, मच्छिमार
खोल समुद्रात वादळी हवामानाच्या धोकादायक हालचाली सुरू असल्याने नुकसानीबरोबरच मच्छिमारांच्या जीवालादेखील धोका होऊ शकतो. सकाळी ऊन पडले असले तरी परिस्थिती क्षणार्धात बदलू शकते. यामुळे छोट्या-मोठ्या शेकडो नौका सोमवारीदेखील आगरदांडा बंदरात उभ्या आहेत.
– धनंजय गिदी, मच्छिमार