| रसायनी | वार्ताहर |
बदलापूर घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हदरलेले असून रायगड मनसे ॲक्शन मोडवर येत जिल्ह्यातील असणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबर त्यांच्या सर्वतोपरी सुरक्षिततेची जबाबदारी शाळेची असल्यामुळे मनसेकडून रसायनीतील शाळा व्यवस्थापनांना पत्रक देऊन सतर्कतेचा इशारा दिला आहे.
राज्यातील खाजगी, शासकीय व अनुदानित अशा सर्व शाळांमध्ये सहा वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने महिला शिक्षकेतर कर्मचारी नियुक्ती करण्याचे आणि खाजगी शाळांमध्ये एक महिन्यात सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने जारी केले आहेत. या आदेशाचे पालन न केल्यास शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल. मुलामुलींच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक शाळेत सखी-सावित्री समितीचेही बंधन घालण्यात आले आहे.
आपल्या शाळेत ही समिती स्थापन केली नसेल तर लवकरात लवकर स्थापन करावी. शाळेचे सुरक्षारक्षक, सफाई कामगार, स्कुल बसचे चालक, मदतनीस आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती बाह्यस्रोतांद्वारे किंवा कंत्राटी पध्दतीने करण्यात येत असली तरी त्यांची काटेकोर तपासणी शाळा व्यवस्थापनात करावी नियुक्तीपूर्वी पोलिसांकडून चारित्र्य पडताळणीही करण्यात यावी आणि कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवावे. वरिल गोष्टीचे लवकरात लवकर आपल्या व्यवस्थापनाने पालन करावे. अशा प्रकारचे पत्रक मनसेने दिले आहे.