| पनवेल | प्रतिनिधी |
खांदा वसाहत परिसरातील खांदेश्वर सरोवरावर गेल्या काही दिवसांपासून उघड्या चोचीच्या करकोच्यांचे थवे सकाळच्या वेळी उतरू लागल्याने नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे. कडक उन्हामुळे सरोवरातील पाण्याची पातळी कमी होत असून, उथळ पाण्यात मासे आणि इतर जलचर सहज उपलब्ध होत असल्याने हे पक्षी अन्नाच्या शोधात येथे दाखल होत आहेत.
पांढऱ्या-करड्या रंगाचे शरीर, लांब मान आणि लांब पाय असलेले हे करकोचे पाण्यात शांतपणे उभे राहून शिकार करताना पाहायला मिळत आहेत. सहसा गोगलगायी, शिंपले, मासे आणि इतर जलचरांवर उपजीविका करणारे हे पक्षी पर्यावरणीय संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. सकाळच्या प्रसन्न वातावरणात सरोवरावर उतरलेला हा थवा निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. खांदा वसाहतीतील अनेक नागरिक सकाळी फेरफटका मारताना या दुर्मिळ पाहुण्यांचे दर्शन घेत आहेत. शहरातील वाढते नागरीकरण आणि कमी होत चाललेली जलसंपदा यामुळे अशा पक्ष्यांचे दर्शन दुर्मिळ होत असताना खांदेश्वर सरोवरात त्यांचे आगमन ही पर्यावरणासाठी सकारात्मक बाब मानली जात आहे.
नागरिकांना घराजवळच निसर्गाचा अनमोल ठेवा अनुभवण्याची संधी मिळाली असून या पक्ष्यांना कोणताही त्रास न देता त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करण्याचे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे. खांदेश्वर सरोवरातील करकोच्यांच्या या आगमनामुळे परिसरातील जैवविविधतेची समृद्धी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. ओपनबिल स्टॉर्क हे पक्षी परदेशातून येणारे स्थलांतरित पक्षी नाहीत.







