दुसर्‍या दिवशीही मासेमारी ठप्प

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

समुद्रात मासेमारी करण्यासाठी दुसर्‍या दिवशीही हवामान अनुकूल नसल्याने सोमवारी (दि.2) एकही पर्ससीन नेट मासेमारी नौका समुद्रात गेली नाही. तसेच, इतरही पारंपरिक नौका बंदरातच उभ्या होत्या.

रविवार दि.1 सप्टेंबरपासून पर्ससीन नेट मासेमारीला परवानगी देण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी समुद्रातील वादळी वार्‍याच्या इशार्‍यामुळे पर्ससीन नेट मासेमारीचा मुहूर्त हुकला आहे. दुसर्‍या दिवशी म्हणजे सोमवारी वातावरण किंवा हवामान अनुकूल होईल आणि नौका समुद्रात मासेमारीसाठी पाठवता येईल, अशी आशा नौका मालकांना होती. परंतु, पहिल्या दिवसापेक्षा सोमवारी हवामान आणखी खराब झाले. समुद्रातील पाण्याला करंट, उंच लाटा, जोरदार वार्‍यासोबत मुसळधार पाऊस असल्याने या दिवशीही नौका समुद्रात जाऊ शकल्या नाहीत.

दरम्यान, पर्ससीन नेट मच्छिमार नौका मालकांनी आपापल्या नौका समुद्रात पाठवण्याची आवश्यक ती सर्व पूर्व तयारी पूर्ण केली होती. मागील मासेमारीच्या हंगामात बहुसंख्य नौकांना अपेक्षित मासळी रिपोर्ट न मिळाल्याने नुकसान झाले होते. नवीन हंगामात हे नुकसान भरून निघेल, अशी अपेक्षा असतानाच मासेमारीचे पहिले दोन दिवस समुद्रातील हवामान अनुकूल नसल्याने वाया गेले आहेत.

Exit mobile version