‘या’ तारेखेपासून होणार मासेमारीला सुरवात

ससूनडॉक, करंजा-मोरा-कसारा बंदरात मच्छिमारांची लगबग

| उरण | वार्ताहर |

खोल समुद्रातील मासेमारीला दोन महिन्यांच्या विश्रांतीनंरत 1 ऑगस्टपासून पुन्हा सुरुवात होणार आहे. पर्ससीन नेट फिशिंग आणि खोल समुद्रातील मासेमारी या दोन्ही प्रकारातील मासेमारीला दहा दिवसांचाच अवधी उरला आहे. सुरु होणाऱ्या मासेमारीच्या पूर्वतयारीसाठी करंजा-मोरा-कसारा, ससून डॉक बंदरात आतापासूनच हजारो मच्छिमारांची बोटींची दुरुस्ती, जाळ्यांची दुरुस्ती करण्याच्या कामाची लगबग सुरु झाली आहे.



ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच खवळलेला समुद्र शांत होतो. निरव शांत झालेल्या सागरात पर्ससीन नेट फिशिंगसाठी पोषक वातावरण असते. राज्यभरातील लाखो मच्छीमार खोल समुद्रातील आणि पर्ससीन फिशिंग या दोन प्रकारातील मासेमारी मोठ्या प्रमाणात करीत असतात. समुद्राच्या पुष्ठभागावरील 4 ते 5 कि.मी. परिघातील परिसरात 35 ते 40 वाव खोलीपर्यत पर्ससीन नेट फिशिंग केली जाते. गोल परिघातील सर्कलमध्ये शिशाच्या गोळ्या बांधलेली जाळी समुद्रात सोडली जातात. गोळाकार सर्कल सिल केल्यानंतर समुद्राच्या पुष्ठभागावरील विविध प्रकारातील तरंगती मासळी अलगद जाळ्यात अडकली जाते. त्यानंतर यंत्राच्या साहाय्याने जाळी मच्छीमार बोटीत खेचली जातात. यामध्ये घोळ, काटबांगडे, मुशी, तकला, सुरमय, शिंगाला, तुणा, हलवा, तांब, पाखट यासारखी समुद्राच्या पृष्ठभागावरील तरंगती मासळी पकडली जाते.



खोल समुद्रातील मासेमारीसाठीही ससूनडॉक, कसारा, मोरा-करंजा बंदरात शेकडो मच्छीमारी ट्रॉलर्स सज्ज होऊ लागले आहेत. खोल समुद्रातील मासेमारीसाठी मच्छीमारांना 50 ते 70 वाव खोल समुद्रात जावे लागते. त्यासाठी एका ट्रिपसाठी 10 ते 12 दिवस खर्ची घालावे लागतात. खोल समुद्रातील एका ट्रिपसाठी अडिच ते तीन लाखापर्यत खर्च येतो. समुद्राच्या तळाशी असलेली सर्वच प्रकारची मासळी या पध्दतीत पकडली जाते. चांगल्या प्रतीची निर्यात करण्यायोगी असलेली मासळी खोल समुद्रातील मासेमारीत मिळत असल्याने या पध्दतीच्या मच्छीमारांची संख्या सर्वाधिक आहे.

कोळी बांधव कामात मग्न
1 ऑगस्टपासून मासेमारी करण्यास सुरुवात होणार असल्याने मच्छिमारांच्या बोटींच्या डागडुजी, रंगरंगोटी आणि अन्य तत्सम कामांची विविध बंदरात लगबग सुरू आहे. 1 ऑगस्टपासून मच्छीमार बोटींना डिझेल उपलब्ध होण्यास सुरुवात होणार आहे. डिझेल भरण्यासाठी मच्छिमार बोटींची कसारा आणि ससून डॉक बंदरात गर्दी आहे. डिझेल, आवश्यक साधनसमुग्री उपलब्ध होताच हजारो मच्छीमार बोटी 1 ऑगस्टपासूनच मासेमारीसाठी रवाना होणार असल्याची माहिती कोळी बांधवांकडून देण्यात आली.

खवय्यांना प्रतीक्षा
मासेमारीला सुरुवात होताच 10-15 दिवसात मासळीची आवक वाढणार आहे. त्यामुळे पावसाळी बंदीनंतर मासळीचे वाढलेले भाव आटोक्यात येणार आहेत. खवय्यांनाही बाजारात विपुल प्रमाणात मासळी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे खवय्यांनाही मासेमारी सुरू होण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

Exit mobile version