। पनवेल । वार्ताहर ।
कळंबोली रोड पाली लिंक रोडवरील एका ढाब्याजवळ, काही जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मध्यवर्ती गुन्हे शाखेचे अंमलदार ओमकार भालेराव यांना मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने छापा मारून गांजा, मोबाईल व चार चाकी असा एकूण जवळपास 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर यामध्ये 4 आरोपींना अटक केली आहे. नशामुक्त नवी मुंबई या अभियाना अंतर्गत अमली पदार्थ विरोधी कारवाईच्या सूचना, आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सर्वच विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार काम करत असताना मध्यवर्ती गुन्हे शाखेचे अंमलदार ओमकार भालेराव यांना विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की, काही इसम हे कळंबोली परिसरात, रोडपाली लिंक रोड वरील डी डी धाब्याजवळ, गांजा विक्रीसाठी येणार आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारावर सहाय्यक आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्या आदेशानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक निरीक्षक महेश जाधव, सहाय्यक उपनिरीक्षक मंगेश वाट, पोलीस अंमलदार नितीन जगताप, दिलीप ठाकूर व ओंकार भालेराव यांनी त्या ठिकाणी सापळा लावून धाड टाकली व चारही इसमांना ताब्यात घेतले. एकूण 9 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
कळंबोलीतून साडेपाच किलो गांजा केला जप्त
