जिल्हा परिषदेच्या आवारात भंगार गाड्यांचा खच

पाच सरकारी गाड्या वर्षभरापासून धूळखात; अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रायगड जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांसह सभापतींच्या दिमतीला असलेल्या सरकारी गाड्यांची क्षमता संपल्याने त्या आता भंगारात जमा झाल्या आहेत. मात्र, या पाच गाड्यांचा लिलाव करण्यात जिल्हा परिषद प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. दोन वेळा निविदा काढूनही प्रतिसाद मिळाला नसल्याने गेल्या वर्षभरापासून या गाड्या जिल्हा परिषदेच्या आवारात धूळखात पडून आहेत. कॅन्टीन आणि महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयासमोरच या गाड्यांचा खच पडल्याने परिसराच्या विद्रूपतेसह अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

अलिबागमधील कुंटेबाग येथील जिल्हा परिषद इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या कॅन्टीन तसेच महिला व बालकल्याण कार्यालयासमोर पाच गाड्या बंद अवस्थेत पडून आहेत. यामध्ये एमएच 06 बीयू 6031, एमएच 06 बीयू 6028, एमएच 06 बीयू 6027, एमएच 06 बीयू 6029 आणि क्रमांक नसलेल्या एका जीपचा समावेश आहे. वापराची क्षमता संपल्याने या गाड्या भंगारात काढण्यात आल्या आहेत.

या गाड्यांचा लिलाव करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून दोन वेळा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, एकाही निविदेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे लिलावाची प्रक्रिया रखडली असून, या गाड्या वर्षभरापासून त्याच ठिकाणी पडून आहेत. विशेषतः जीपची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.

कार्यालयीन परिसरातच भंगार गाड्या पडून असल्याने त्या ठिकाणी दंश करणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. कॅन्टीन आणि महिला व बालकल्याण कार्यालयात येणारे कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी हा संभाव्य धोका ठरू शकतो. त्यामुळे लिलावाला प्रतिसाद मिळत नसल्याने भंगार गाड्यांचा प्रश्न नेमका कधी मार्गी लागणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

जिल्हा परिषदेच्या आवारात असलेल्या गाड्या भंगारात काढण्यात आल्या आहेत. या गाड्यांचा लिलाव करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या; परंतु त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

– जलिंदर पाठारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी,
सामान्य प्रशासन, जिल्हा परिषद

Exit mobile version