रोहा आगारातील पाच कर्मचारी निलंबित

। रोहा । प्रतिनिधी ।
राज्यपरिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदाचे निरनिराळे पडसाद उमटत आहेत. एकीकडे हा संप चिघळत असतानाच, बंदाच्या पार्श्‍वभूमीवर रोहा आगारातील पाच कर्मचार्‍यांचे निलंबन करण्यात आले आहे.
राज्यपरिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांतर्फे ठराविक मागण्यांसाठी बंदाचे अस्त्र उगारले आहे. दिवाळीच्या काळात या अस्त्राची धार बोटथ करून जनसामान्यांना दिलासा देण्यासाठी राज्यशासनाने एक प्रमुख मागणी वगळता अन्य सर्व मागण्यांना मंजूरी दिली. यासमयी, सर्वांनाच तात्काळ दिलासा मिळाला. कारण काही काळ उठविण्यात आलेला बंद पुन्हा सुरू झाला.
राज्यशासनात विलनीकरण होण्याची बहुप्रतिक्षित तथा प्रलंबित मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही बंद मागे घेणार नसल्याच्या भूमिकेवर एसटी कर्मचारी ठाम झाले असून, प्रसंगी राज्यशासन तथा एसटी प्रशासनाकडून सहकार्याचे आवाहनही करण्यात येत आहे. तर विविध संघटना तथा प्रतिष्ठित व्यक्तींनी या बंदास पाठिंबा दिला आहे.
सामदाम या दुहेरी नितीचा अवलंब केल्यानंतर, आता प्रशासनाने दंडनितीचा अवलंब सुरू केला आहे. याच अंतर्गत विविध आगारातील एसटी कर्मचार्‍यांचे निलंबन करण्यात येत असून, रोहा आगारातील चालक, वाहक, टंकलेखक तथा आगार नियंत्रक अशा पाच कर्मचार्‍यांचे निलंबन करण्यात आले आहे. या निलंबनाच्या सूचना फलकावर लावण्यात आल्या असून, याप्रकारामुळे कामगार वर्गात निर्माण झालेला असंतोष तीव्र होत असल्याचे चित्र समोर येत आहे.

Exit mobile version