। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबागहून रोह्याला जाणारी एसटी बस दोन तास उलटूनही सोडण्यात आली नाही. त्यामुळे रोहा मार्गावर जाणार्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. त्यांना स्थानकात ताटकळत उभे राहण्याची वेळ आली. एसटी बस आगारातील प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे प्रवासी वर्गात संताप निर्माण झाला होता.
रोहा आगारातील एसटी बस अलिबाग एसटी बस स्थानकातून दुपारी तीन वाजता सुटते. परंतु ती बस आलीच नाही. त्यामुळे प्रवाशांना अलिबाग स्थानकात ताटकळत उभे राहण्याची वेळ आली. रांगेत दोन तास उभे राहूनदेखील अलिबाग एसटी बस आगारातील स्थानक प्रमुखांकडून कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप तेथील प्रवाशांनी केला. याबाबत विचारणा केली, असता रोहा आगारातून सुटणारी एसटी बसमध्ये रस्त्यात बिघाड झाला आहे. त्यामुळे ती बस अलिबाग स्थानकात येऊ शकली नसल्याची माहिती उपलब्ध झाली. रोहाकडे जाणार्या प्रवाशांना दोन तास एसटीची वाट पहात स्थानकात उभे राहवे लागले. त्यामध्ये वयोवृध्द, महिला व इतर प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. रोहाकडे जाणारी एसटी बस दोन तास उशीरा लागल्याने प्रवाशांना त्यांच्या निश्चित स्थळी पोहचण्यास विलंब झाला. एसटी बस आगारातील मनमानी कारभाराबाबत प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.
दुपारी तीनची रोहा एसटी बस अलिबाग स्थानकातून सुटेल या आशेने प्रवासी फलाट क्रमांक सातसमोर उभे होते. साडेतीन वाजून गेले, तरीही एसटी बस स्थानकात लावली नसल्याने प्रवाशांनी गोंगाट करण्यास सुरुवात केला. काही प्रवाशांनी स्थानक प्रमुखांसमवेत संवाद साधत बस लावण्याची मागणी केली. परंतु त्यांच्याकडूनही समाधानकारक उत्तरे मिळाली नाही. गाडी संध्याकाळी सहा वाजता लागेल असे सांगून त्यांनी वेळ काढूपणा केल्याचा प्रयत्न केला. एसटी बस स्थानकातील अधिकार्यांच्या मनमानी कारभारामुळे नाराजी व्यक्त केली.
रवि झावरे,
प्रवासी