। तळा । वार्ताहर ।
वाढत्या उष्णतेमुळे तळा बाजारपेठेत थंडपेयांना मागणी वाढली असून उष्णतेमध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी नागरिकांची पाऊले आपसूकच थंड पेयांकडे वळली आहेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्णतेचे प्रमाण वाढले असल्याने या उष्णतेपासून वाचण्यासाठी नागरिकांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
उन्हातून काम करताना थकलेल्या शरीराला थंडावा देण्यासाठी नागरिकांकडून थंड पेयांना पसंती मिळत आहे. यासाठी तळा बाजारपेठेत विविध थंडपेये विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी या थंड पेयांच्या किमतीत वाढ झाली आहे. ज्यूसच्या वाढलेल्या किमतीचं प्रमुख कारण म्हणजे फळांचे वाढलेले दर. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी फळांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. ज्यामध्ये 160 रुपये प्रतिकिलो मिळणारे सफरचंद आता 200 रुपये प्रति किलोप्रमाणे मिळत आहेत. अननस 100 ते 120 रुपये प्रति किलोप्रमाणे मिळत आहे. संत्री व मोसंबीच्या दरातही वाढ झाली संत्री व मोसंबी आता 120 रुपये प्रति किलोप्रमाणे मिळत आहेत.