। मनोर । प्रतिनिधी ।
पालघर तालुक्याच्या पूर्वेकडील मासवण-नागझरी रस्त्यावरील खरशेत गावातील गोवारीपाड्यात शनिवारी (दि. 27) रात्री आकाशातील वीज घरावर कोसळून पाच जण जखमी झाले होते. जखमींवर मनोर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर घरी सोडून देण्यात आले. टीव्हीच्या डिश ॲन्टेनाच्या केबलमधून विजेचा लोळ घरात शिरल्याने भिंतीला भेग पडली आहे. विजेमुळे टीव्ही आणि विद्युत उपकरणे जळून मोठे नुकसान झाले आहे.
पालघर जिल्ह्यात शनिवारी रात्री ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास खरशेत गोवारीपाड्यातील विलास धानवा यांच्या घरावर वीज पडली. स्वयंपाकघरामध्ये काम करणाऱ्या दोघी, तसेच हॉलमधील तिघांना विजेचा धक्का बसला. या घटनेत वैशाली विलास धानवा (49), ऋतिक (19), सोनम प्रकाश धानवा (24), भारती भरत साबला (30) आणि तेजल (12) या जखमी झाल्या. त्यांच्यावर मनोरच्या रुग्णालयात उपचार केल्यानंतर रविवारी (दि. 28) सकाळी जखमींना घरी सोडण्यात आले.







