। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायत हद्दीत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव स्थानिकांसाठी डोकेदुखी बनला आहे. या भटक्या कुत्र्यांनी अनेक लहान मुलांना चावा घेतला आहे. दरम्यान स्थानिक ग्रामस्थ आणि लहान मुलांचे या भटक्या कुत्र्यांपासून संरक्षण व्हावे, यासाठी उमरोली ग्रामपंचायतीने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी रायगड भूषण किशोर गायकवाड यांनी केली आहे.
कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर असलेल्या उमरोली ग्रामपंचायत हद्दीमध्ये उमरोली, आषाणे, पोतदार वसाहत, पाली वसाहत, डिकसळ या गावाच्या प्रस्त अनेक भटकी कुत्री आढळून येत आहेत. त्यात नव्याने या भागात येणाऱ्या कुत्र्यांची संख्या मोठी आहे. त्यातही प्रामुख्याने या भागात कुत्रे आणून सोडले जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्या नव्याने आलेल्या कुत्र्यांमुळे शाळेत जाणारे विद्यार्थी यांच्यात प्रचंड भीती निर्माण झाली असून स्थानिकांना त्याचा त्रास होत आहे. या भटक्या कुत्र्यांनी एकाच दिवसात पोद्दारमधील ऋषिकेश पवार या मुलाला चावा घेतला असून उमरोली येथील प्रसाद लोंगले, नागो घारे यांनाही चावा घेतला आहे. तसेच, या सर्वांसोबत आणखी तिघांना चावा घेतला असून सर्व जखमींवर रायगड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
उमरोली ग्रामपंचायतने याची दखल घेऊन ग्रामपंचायत स्तरावर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक अनिकेत सावंत यांनी उमरोली ग्रामपंचायतकडे केली आहे. तर रायगड भूषण ग्रामस्थ किशोर गायकवाड यांनी ग्रामपंचायत प्रशासनाने कुत्रे आपल्या ग्रामपंचायत हद्दीत आणून सोडणाऱ्यावर कारवाई करण्याची तसेच भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.





