। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान गिरीस्थान नगरपरिषदसाठी मतदान सुरू असून सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीकडून पाच लाख रुपयांची रोकड जप्त करत त्याला कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. त्या व्यक्तीकडून त्या पाच लाख रुपयांबाबत कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे संबंधित रक्कम निवडणूक विभागाने जप्त केली आहे. मात्र या प्रकाराने माथेरान नगरपरिषद निवडणुकीला गालबोट लागले आहे.
माथेरानमध्ये नगरपरिषद निवडणुक सुरू असून आज सकाळी शहरातील सर्व दहा प्रभागात शांततेत मतदान सुरू झाले. माथेरान शहराचे लक्ष लागून राहिलेल्या प्रभाग दहामध्ये मतदान सुरू असताना पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या लेक व्ह्यू हॉटेलच्या बाजूला एक व्यक्ती प्लास्टिक पिशवी सांभाळून घेऊन जात असल्याचे शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते नितीन विश्वनाथ सावंत यांना दिसले. हॉटेल बाईक या नावाचे कपडे परिधान केलेली व्यक्ती हॉटेल कर्मचारी प्रकाश गुप्ता असून त्या व्यक्तीला त्या पिशवीत काय आहे, असे विचारले असता तो बाजूच्या रस्त्याने जाऊ लागला. त्यामुळे नितीन सावंत यांनी त्या व्यक्तीजवळील पिशवी स्थानिक पोलीस यांना तपासण्यास सांगितली. त्यावेळी त्या पिशवीमध्ये पाच लाखाची रोकड असल्याचे आढळून आले असून दि बाईक हॉटेलचे व्हाउचर त्या पैशांसोबत होते. हॉटेल व्यवस्थापक यांची सही असलेले ते व्हाउचरवर कोणत्या व्यक्तीला ते पैसे देण्यासाठी नेण्याची नोंद नव्हती.
त्यामुळे पोलिसांनी संबंधित व्यक्तीला माथेरान नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नेले. तेथे त्या प्रभागातील शिवराष्ट्र पॅनलचे उमेदवार प्रसाद सावंत, थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजय सावंत हे देखील हजर होते. शेवटी निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र ठाकूर यांनी संबंधित रक्कम निवडणूक यंत्रणा यांच्याकडे जमा करून ठेवण्याचा निर्णय झाला. त्या ठिकाणी दी बाईक हॉटेलमधील व्यवस्थापक या हजर झाल्या होत्या आणि त्यांनी सदर रक्कम बँकेत नेण्यासाठी दिली असल्याच सांगितले. परंतु हॉटेलचे करंट अकाऊंट असताना त्या पैशांचा भरणा करण्याची कोणतीही पावती त्या व्यक्तीकडे नसल्याने त्या पैशाचा वापर निवडणुकीसाठी केला जाणार असल्याचा संशय वाढला आहे. पोलीस यांच्या उपस्थितीत निवडणूक यंत्रणा यांनी त्या पाच लाख रुपयांचा पंचनामा केला आहे. ती रक्कम सध्या निवडणूक यंत्रणेच्या ताब्यात असून त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र माथेरानमधील राजकीय वातावरण या पैशाच्या ने-आण प्रकरणे तापले आहे.







