कर्जतमधून पाच अल्पवयीन बेपत्ता

4 मुली, 1 मुलगा यांचा समावेश परिसरात चिंतेचे वातावरण
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील चार मुली आणि एक मुलगा असे एकूण पाच अल्पवयीन बेपत्ता झाले आहेत. यासंदर्भात कर्जत शहर आणि नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत.
याप्रकरणी दाखल तक्रारीनुसार, नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील ममदापुर भागातील शाही पॅलेस या इमारतीमधील दोन अल्पवयीन मुले 7 डिसेंबर रोजी घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेली आहेत. संबंधित कुटुंबातील 16वर्षाची मुलगी आणि 13 वर्षाचा मुलगा हे घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेले आहेत कि त्यांना फूस लावून पळवून नेले आहे. याबाबत कोणतीही माहिती नाही.
यामुळे पालकांनी आपली दोन अल्पवयीन मुले हरवली असल्याची तक्रार नेरळ पोलीस ठाण्यात केली आहे. याबाबत नेरळ पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक मुळीक अधिक तपास करीत आहेत.
तर कर्जत पोलीस ठाणे हद्दीमधील दहिवली भागातील 15 वर्षे वय असलेल्या तीन अल्पवयीन मुली घरातून शाळेत जाण्यासाठी निघाल्या होत्या. शाळेच्या गणवेशात 13 डिसेंबर रोजी घराबाहेर पडलेल्या त्या तिन्ही अल्पवयीन मुली शाळा सुटल्या नंतर नेहमीच्या वेळी घरी परत आल्या नाहीत, म्हणून त्यांचा शोध घेतला. मात्र त्यांचा कुठे शोध लागला नसल्याने त्या तिन्ही मुली हरवल्या असल्याची तक्रार त्यांच्या पालकांनी कर्जत पोलीस ठाण्यात सोमवारी सांयकाळी दिली.
यानंतर मुलीचे हरवण्याची प्रमाण लक्षात घेऊन कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी तपास हातात घेतला. त्यांनी इंदिरानगर पासून शाळा या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यावेळी त्यांना त्या मुली शाळेच्या गणवेशात कर्जत रैवलंय स्थानकात आढळून आल्या. पुढे त्या तिन्ही मुली लोकल पकडून निघाल्या असता त्यांच्याबरोबर एक तरुण होता. पुढे या तिन्ही तरुणी विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात उतरल्या आणि नंतर पुढे कुठे गेल्या याबाबत काहीही माहिती मिळत नाही.
याबाबत पोलिसांनी आपली तपासाची सुत्रे फिरवली आहेत. तरीही बेपत्ता मुलांचे पालक चिंतेत असून, अल्पवयीन बालके एककी बेपत्ता झाल्याने परिसरातही शंकाकुशंकाचे वादळ उठले आहे.

Exit mobile version