फलटण येथे डांबून ठेवलेल्या सुधागड तालुक्यातील मुलीची पाच महिन्याने मुक्तता

सर्वहारा जन आंदोलन संघटनेला यश
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
सुधागड तालुक्यातील गायमाळ नेनवली येथील नामदेव गणपत वालेकर, अनुसया नामदेव वालेकर व मुलगी अंजना नामदेव वालेकर (वय अंदाजे 15 वर्ष) व गौरू लक्ष्मण पवार, लक्ष्मी गौरू पवार, मुलगा नितेश गौरू पवार हे दोन कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून सोनवडी ता.फलटन, जि.सातारा येथील कोळसाभट्टी मालक हसन शेख व अहमद शेख यांच्याकडे कामाकरीता गेले होते. काम आटोपून ते घरी निघाले. हिशोबाचे पैसै अंगावर राहिल्याने मालकाने अंजना व नितेश या दोन लहान मुलांना अडकवून ठेवले आणि आई वडीलांना हकलून दिले. कोळसाभट्टी मालक हसन शेख यांनी अंजना आणि नितेश यांना त्यांच्या घरी गुरे, शेळ्या राखणे व पोल्ट्रीच्या कामाकरीता अडकवून ठेवले होते.

याप्रकरणी नामदेव वालेकर यांनी मालक मुलांना सोडत नसल्याची तक्रार दि.23 मार्च 2023 रोजी संघटनेकडे केली. संघटनेच्या संस्थापिका उल्का महाजन, सोपान सुतार, चंद्रकात गायकवाड यांनी रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांच्याकडे दि.24 मार्च 2022 रोजी तक्रार केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून दुधे यांनी तात्काळ पाली सुधागड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्‍वजीत काईंगडे यांना सुचना देवून याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक काईंगडे यांनी फलटन ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क करून सोनवडी गावात जाऊन चौकशी करण्यास सांंगितले. फलटन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनावणे यांनी सोनवडी गावात जाऊन या लहान मुलांना ताब्यात घेतले.

संघटनेचे अध्यक्ष सोपान सुतार, चंद्रकात पवार व मुलीचे आई-वडील यांनी सातारा येथे जाऊन बाल कल्याण समीतीकडून मुलांना ताब्यात घेतले व सोमवारी रायगड बाल कल्याण समिती समोर हजर करून मुलीचे आई-वडील सोबत असल्याने अंजना हिला त्यांच्या ताब्यात दिले. तसेच नितेश याचे आई-वडील तेथे नसल्याने त्याला बाल समितीने स्वतःच्या ताब्यात घेऊन ठेवले आहे.

अशाप्रकारे अंजना व नितेश या दोन लहान बालकांना मालकाच्या ताब्यातून सोडवून त्यांच्या आई वडीलांची भेट घडवून आणण्यात संघटनेला यश आले आहे. याबाबत रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक अशोक दुधे, पाली पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक विश्‍वजीत काईंगडे व फलटन ग्रामीण पोलीस ठाणे सपोनि सोनावणे यांचे सर्वहारा जन आंदोलन संघटनेने विशेष आभार व्यक्त केले.

Exit mobile version