54 कोटींच्या अपहारप्रकरणी पाचजण ताब्यात

। पनवेल । वार्ताहर ।

मुंबई महानगर प्रदेश लोखंड व पोलाद बाजार समितीमध्ये जून महिन्यात 54 कोटी रुपयांचा अपहार उघडकीस आला होता. नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग 2 चे पथक या प्रकरणाचा तपास करत असून आतापर्यंत चौघांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी बाजार समितीमधील सेवानिवृत्त मुख्य लिपिक संजय माधव पाटील याला गुजरात येथून अटक केली.

पाटील यांच्या अटकेनंतर या प्रकरणातील आरोपींची संख्या पाचवर पोहचली आहे. बाजार समितीमधील आणखी कोणते बडे अधिकारी या अपहारात सामील आहेत. याचा छडा पोलीस तपासात लागणार आहे. लोखंड पोलाद बाजार समितीच्या बँक खात्यातील रक्कम मुदतठेवी युको बँकेत ठेवून सर्वाधिक व्याज देतो, या बहाण्याने सुमन शर्माने बाजार समितीमधून मागील दोन वर्षांत वेगवेगळे धनादेश घेऊन 54 कोटी रुपयांचा अपहार केला. या अपहारातील मोठी रक्कम अद्याप पोलिसांना सापडली नाही. मात्र या अपहारात बाजार समितीमध्ये काम करणार्‍या व्यक्तींच्या मदतीशिवाय हा अपहार अशक्य असल्याने पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडे अधिक चौकशी केल्यावर त्यांनी अनेकांची नावे घेतल्याचे सूत्रांकडून समजते.

पोलीस मागील अनेक दिवसांपासून संजय पाटील याच्या मागावर होते. न्यायालयातून जामीन मिळविण्यासाठी संजय अनेक दिवस न्यायालयाच्या घिरट्या घालत होते. अखेर डोंबिवली येथे राहणार्‍या संजय यांना पोलीस निरीक्षक उमेश गवळी यांच्या पथकाने अटक केली. सुमन शर्मा या बनावट व्यक्तीने युको बँकेचा व्यवस्थापक असे भासवून बाजार समितीला 8 जून 2022 रोजी मुदतठेवींसाठी दरपत्रक सादर केले. शर्माने सादर केलेल्या दरपत्रकानंतर दुसर्‍याच दिवशी शर्मा याला धनादेश देण्यासंदर्भात बाजार समितीमध्ये अतितातडीने नोटशिट बनविण्यात आली. या नोटशिटवर बाजार समितीचे मुख्य लिपिक संजय पाटील, कनिष्ठ लिपिक संगीता म्हात्रे, लेखाधिकारी अमिष श्रीवास्तव, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी केदार जाधव यांच्यासह बाजार समितीचे अध्यक्ष अशोक गर्ग यांची स्वाक्षरी होती. त्यानंतर 6 कोटी रुपयांचा पहिला धनादेश शर्मा यांना देण्यात आला. संजय पाटील यांच्यासह या गंभीर फसवणुकीच्या प्रकरणात अजून कोण सामील आहे, याकडे बाजारातील 1900 व्यापार्‍यांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version