झॅगरेब स्पर्धेसाठी कुस्ती संघ जाहीर
। नवी दिल्ली । वार्ताहार |
क्रोएशिया येथील झॅगरेब येथे होणार्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी भारताचा कुस्ती संघ मंगळवारी जाहीर करण्यात आला. येत्या 10 ते 14 जानेवारी या कालावधीत खेळवण्यात येणार्या स्पर्धेसाठी भारतीय संघात 13 खेळाडूंची निवड करण्यात आली. फ्रीस्टाईल व ग्रीको रोमन या पुरुष विभागांसाठी तसेच महिला विभागासाठी याप्रसंगी खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. बजरंग पुनिया याच्यासह पाच कुस्तीपटूंनी या स्पर्धेमधून माघार घेतली आहे. यामध्ये अंतिम पंघालचाही समावेश आहे.
भारतीय ऑलिंपिक समितीकडून नियुक्त करण्यात आलेल्या हंगामी समितीकडून ही निवड करण्यात आली असून तीन सदस्यीय समितीचे प्रमुख म्हणून भूपिंदर सिंह बाजवा हे कार्यरत आहेत. याप्रसंगी त्यांनी म्हटले की, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून तत्काळ पुढाकार घेण्यात आल्यामुळे झॅगरेब ओपन स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करता आली.त्यांच्या व्हीसाचा प्रश्नही लवकर मिटला. या स्पर्धेत सहभागी होत असलेल्या भारतीय खेळाडूंना आशियाई स्पर्धेची पात्रता फेरी व जागतिक स्पर्धेची पात्रता फेरी यासाठी सज्ज होता येणार आहे, असेही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.भूपिंदर बाजवा यांनी बजरंग पुनियाच्या अनुपस्थितीबाबत मत व्यक्त करताना म्हटले की, बजरंग पुनिया याने अद्याप मॅटवरील सरावाला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे झॅगरेबमधील स्पर्धेत तो खेळणार नाही
भारताचा कुस्ती संघ पुरुष फ्रीस्टाईल (पुरुष) - अमन (57 किलो वजनी गट), यश (74 किलो वजनी गट), दीपक पुनिया (86 किलो वजनी गट), विकी (97 किलो वजनी गट), सुमीत (125 किलो वजनी गट). ग्रीको रोमन - ग्यानेंदर (60 किलो वजनी गट), नीरज (67 किलो वजनी गट), विकास (77 किलो वजनी गट), सुनीलकुमार (87 किलो वजनी गट),नरिंदर चीमा (97 किलो वजनी गट), नवीन (130 किलो वजनी गट).
भारताचा कुस्ती संघ महिला सोनम (62 किलो वजनी गट), राधिका (68 किलो वजनी गट). प्रशिक्षक व सहाय्यक स्टाफ - कुलदीप सिंह (संघ नायक व प्रशिक्षक), विनोदकुमार, सुजीत, शशी भूषण प्रसाद, मनोजकुमार, वीरेंदर सिंह, अलका तोमर