दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
दक्षिण-पश्चिम दिल्लीतील सत्य निकेतनजवळ पाचन मजली इमारत कोसळल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून, तिघे गंभीर जखमी झाले आहेत. तर, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळं सत्य निकेतन परिसरात घबराट पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाला दुपारी दीड वाजता माहिती मिळाली. अग्निशमन दलाची पथकं आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, सध्या बचावकार्य सुरू आहे. ही घटना मोती बाग येथील सत्य निकेतनमधील शिव मंदिराच्या जवळ घडली. घटनास्थळी अग्निशमन दलाची बारा वाहनं दाखल झाली आहेत. मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू असून, पथकं सातत्याने ढिगारा हटवत आहेत. सहा जणांना वाचवण्यात आलं असून, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलानं एसडब्ल्यूटी, बीएफटी, डब्ल्यूबी, आयआरटी आणि क्यूआरव्ही यासह अनेक पथकं घटनास्थळी रवाना केली.







